नांवात काय आहे?

नांवात काय आहे?…….शेक्सपियरला पडलेला प्रश्न…..

कु. वैशाली दुष्यंत कुलकर्णी आणि सौ. प्रज्ञा रविंद्र महाजन…. यात साम्य काय आहे? तर ती अस्मादिकांची नावें आहेत. माझं बॅंकेत खातं चालू करायचं होतं तेव्हा पुराव्यासाठी जी कागदपत्रे जमा केली होती, त्यात काही कागदपत्रे कु. वैशाली दुष्यंत कुलकर्णी या नांवाची होती. मग दोन्ही नावांची व्यक्ती एकच आहे हे दाखवण्यासाठी मॅरेज सर्टीफिकेट, पॅन कार्ड पुरावा म्हणून द्यावे लागले….लग्नानंतर मधलं नांव बदलणार हे मुलींच्या बाबतीत होत असतं….काही भाग्यवान अशा असतात की त्यांना सासरपण माहेरच्या आडनावांचं मिळतं…. एखादी थ्री ईडीयट्स मधली करीना सांगते – वांगडू….? नहीं नहीं, मै शादी के बाद अपना सरनेम चेंज नही करूंगी….. 🙂 अशांचं प्रमाण हळूहळू वाढतंय्‌ असं म्हणतात बुवा…. 🙂 (आजचा मुद्दा  हा नाहीय्‌.)

माझ्याबाबतीत नांव, मधलं नांव, आडनांव सगळंच बदललं…. माझ्या नणंदेचं नांवही वैशाली त्यामुळे माझं नांव बदलावंच लागलं. तेव्हा नवरा म्हणाला होता- तुला वैशाली म्हणून हाक मारली तर बहिणीला हाक मारतोय असं वाटेल. 🙂 (शेक्सपियर बाबा ऎकतोयस्‌ नां, नावांत काय आहे, कळालं कां…..?) मग नवर्‍याने सांगितलं की आता तुला तुझ्या आवडीचं नांव मिळेल. तुला आवडणारी नावं सांग. मी त्यातलं एखादं निवडतो . कारण ते नांव तुझं असलं तरी शेवटी ते जास्त वेळा मी म्हणणार आहे… 🙂 वॉव … हा दृष्टीकोन आवडला मला. मी नाही माझं नांव बदलणार यापेक्षा बदलावंच लागणार आहे तर आपल्या आवडीचं नांव कां निवडू नये? बारशाला जेव्हा आई, बाबा, आत्या किंवा घरातील कोणी वडीलधारे नांव ठरवतांत तेव्हा आपल्याला चॉईस नसतो. ते त्यांच्या आवडीचं नांव ठेवतात. मग मला संधी मिळतेय्‌ तर चांगलं मनासारखं नांव ठेवून घेऊ.  🙂  असा विचार मी तेव्हा केला…. या गोष्टीला १० वर्ष झाली असली तरी आत्ता कालपरवा घडल्याप्रमाणे सगळं लख्ख आठवतंय्‌….. 🙂  त्यावेळी मला ‘ई’ कारान्त नावं आवडायची नाहीत, माझं नांव मोठ्ठं आहे असं वाटायचं. माझं स्वतःचं नांव ‘ई’ कारान्त- वैशाली होतं म्हणून असेल कदाचित… म्हणजे कसं आपले केस सरळ असतील तर कुरळे केस आवडतात, किंवा डोळे काळे असतील तर घारे डोळे आवडतात तसं….. 🙂 मला ‘आ’ कारान्त नावं आवडायची म्हणजे श्रध्दा, आकांक्षा, शलाका, विशाखा वगैरे…. त्याप्रमाणं मी काही नावं नवर्‍याला सुचवली… त्यानं ‘प्रज्ञा’ नांव सुचवलं म्हणाला तुला आवडतंय्‌ कां बघ….!!! हाय्‌….तेव्हाचे काय मोरपंखी दिवस होते की तो जे म्हणेल ते आवडायचंच….. 🙂 ( असो, हाही आजचा मुद्दा नाहीय्‌) तर मला नांव आवडलं – माझ्या सगळ्या अटींमधे बसणारं… ‘आ’ कारान्त , छोटं आणि सहजासहजी अपभ्रंश न करता येणारं….

आमचं लग्न ठरल्याठरल्या माझं नांव काय ठेवायचं हे ठरवलं गेलं. त्यावेळी जेव्हा ‘तिकडून’ फोन यायचा आणि चुकुन माझ्याऎवजी माझ्या आई-बाबांनी फोन उचलला तर ‘प्रज्ञा आहे कां, तिच्याकडे फोन देता कां?’ अशी विचारणा झाली की त्यांना थोडं गोंधळायला व्हायचं. हळूहळू त्यांनाही मला ‘प्रज्ञा’ म्हणून बोलावलेलं ऎकायची सवय झाली. माझं मन तर आता असं तयार झालं आहे की नाशिकला कुणी मला वैशाली म्हणून हाक मारली तर पटकन्‌ ‘ओ’ दिली जात नाही. माहेरी गेले की तिकडे सगळे ओळखीचे, नातेवाईक, मैत्रिणी, शेजार-पाजारचे मला ‘वैशाली’ म्हणूनच बोलावतात आणि इकडे सासरी सगळे ‘प्रज्ञा’ म्हणूनच बोलावतात…..‘वैशाली’ अशी हाक ऎकली की “काय गं? थांब गं थोडी, येतेय नां मी….!!” असं म्हंटलं तरी चालतं पण ‘प्रज्ञा’ अशी हाक ऎकली की “ओ, आले हं….”(एकदम नाजूक, गोड आवाजात वाचा म्हणजे तसा फिल येईल…) असं आपसूकच उत्तर येतं आणि हा स्वीचओव्हर इतका नकळत होतो…..

खरंच आपण बायकाच एवढं ‘अ‍ॅडजेस्ट’ करून घेऊ शकतो… 🙂 (हा तर सर्वकाळचा मुद्दा आहे नां!!!)


 

2 comments on “नांवात काय आहे?

  1. देवेंद्र चुरी म्हणतो आहे:

    >>>शेक्सपियर बाबा ऎकतोयस्‌ नां, नावांत काय आहे, कळालं कां…..?

    हे आवडल ..पोस्ट छानच झाली आहे … इतकी वर्षे एक नाव एखाद्या अवयवप्रमाणेच चिकटलेले असतांना ते बदलून दुसर्या नावात एड्जस्ट होणे …मानल तुम्हा लोकांना …

Leave a reply to प्रज्ञा उत्तर रद्द करा.