तेचsss ते …

रोजचा माझा दिवस हा असा असतो.

सकाळी ५.३० ला उठून अन्हिक, स्नान आणि कधीतरी व्यायाम उरकला की स्वयंपाकाला लागते. आमच्या तिघांचे (मी, अहो, श्रृती) डबे करायचे असतात. ( अहोंच्या कंपनीत कॅंटीन असले तरी घरचाच पोळी-भाजीचा डबा घेऊन जातात.) त्यात आमच्या बाईसाहेबांच्या मागण्या असतात की ‘आई, आज पोळी-भाजी नको. काहीतरी मस्त दे’. स्वयंपाक करून डबे भरून होइतोपर्यंत ७.२० झालेले असतात. श्रृतीची शाळेची व्हॅन येते. ( माझा स्वयंपाक चालू असतो तेव्हा लेकीचं सगळं अगदी ब्रश, आंघोळ, शाळेचा युनिफॉर्म घालणे , शूज घालणे हे सर्व माझा नवरा करतो.(कित्ती चांगला आहे माझा नवरा !!) मी फक्त(?) तिच्या केसांचा बो घालते.) श्रृतम्मा शाळेत गेली की नाष्टा करून नवरा ८.०० च्या सुमारास कंपनीत जातो. मी ८.१५ च्या दरम्यान घरातून निघते.

गंगापूर रोडला लागले की समोर भोसला कॉलेजसमोर बहुतेकदा ‘गिरणारे’ची बस उभी दिसते. लवकर निघाले तर रस्त्यात ती बस कुठेनाकुठे तरी दिसतेच. (बसचा संप नसेल तर !!) उशिरा निघाले तर जेहान सर्कलपाशी अशोकाची स्कूलबस क्रॉस होते. थोडं पुढे गेलं की मॉर्डन कॅफेपाशी बर्‍याच गाड्या उभ्या असतात , त्यात एक निळ्या रंगाची पॅशन हमखास असतेच. अजून थोडं पुढे गेल्यावर मागून एक होंडा सिटी मामा मुंगी कार्यालयाच्या गल्लीतून जोरात ‘शिंग’ वाजवत येते. ती मला माझ्या स्कूटीच्या साईडमिरर मधून दिसते. मी लगेच बाजूला होऊन होंडा सिटीला पुढे जायला जागा करून देते. दरवेळी माझ्या मनात विचार येतो की या होंडा सिटीवाल्याला एवढा उशिर रोज होत असेल तर बिचारा घरातून लवकर बाहेर कां पडत नाही? ही होंडा सिटी मला ओलांडून डोंगरे मैदानाच्या सर्कलला उजवीकडे वळसा घालून पुढे कॅनडा कॉर्नरकडे जाते. मग एक मागून ओपन असलेली, प्रवाशांच्या वाहतुकीची व्हॅन (नाशिकमध्ये त्याला शेअर-रिक्षा / शेअर-व्हॅन म्हणतात, कोल्हापूरमध्ये वडाप !) दिसते. ही व्हॅन पोलिसव्हॅनसारखी आहे,म्हणजे ड्रायव्हरच्या केबिनपासून व्हॅनच्या मागच्या दरवाज्यापर्यंत सलग लांब ,एकासमोर एक अशा दोनच सीट्स. त्या व्हॅनमध्ये कॉलेजचे तीन विद्यार्थी, दरवेळी एका सीट्वर एक आणि दुसर्‍या सीटवर दोन असे बसलेले दिसतात. मी डोंगरे मैदानाच्या सर्कलवरून पुढे आले की के.टी.एच्‌.एम्‌. कॉलेजच्या उड्डाणपुलाच्या आसपास परत एक गिरणारेकडे जाणारी बस दिसते. द.मा.म.वि.ये की गिरणारेला बसची ‘फ्रीक्वेन्सी’ चांगली आहे. पुढे गेलं की एका रिक्षास्टॅंडपाशी चार-पाच जण घोळका करून एकच पेपर वाचताना दिसतात. मग येतं माझं ऑफिस. ते एका कमर्शिअल कॉम्प्लेक्समध्ये आहे. बरीच दुकाने, दोन-चार दवाखाने, एक ८वी ते १२वी च्या विद्यार्थ्यांसाठीचा क्लास अशी खिचडी या कॉम्प्लेक्समध्ये आहे. त्यामुळे रोज स्कूटी लावताना पार्किंगमध्ये रिकामी जागा शोधताना ४-५ मि. जातात. द.मा.म.वि.ये की उद्या घरातून जरा लवकर निघायला हवे. मग ऑफिसमध्ये गेल्यावर नेहमीचं काम चालू होतं.

ऑफिसची वेळ संपल्यावर बाहेर पडलं की स्कूटी पार्किंगमधून बाहेर काढणं हे दिव्य काम पार पाड्लं की बॅक टू पॅव्हेलियन.!! स्कूटी पार्किंगमधून बाहेर काढणं हे दिव्य काम अशासाठी की बहुतेकदा माझ्या स्कूटीच्या मागे रिक्षा, चारचाकी गाडी असते किंवा स्कूटीला अगदी चिकटून अवजड बाईक लावलेली असते. मग अशावेळी दुकानदार किंवा विद्यार्थ्यांपैकी कोणीतरी मदतीला येतं आणि अस्मादिक घरच्या रस्त्याला लागतात. जो रस्ता सकाळी एकदम मोकळा असतो तो आता माणसांनी, वाहनांनी भरून वहायला लागलेला असतो. माझी ऑफिसची वेळ संपायच्या सुमारास कॉलेजेसपण सुटत असतात. आमच्या ऑफिसच्या जवळच एक बस स्टॉप आहे, जो सकाळी एकदम रिकामा असतो तो आता कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ओसांडून जात असतो. ती गर्दी पार करून गंगापूर रोडला लागलं की जरा हायसं वाटतं. आता आजूबाजूला पहायला वेळ आणि उत्साह दोन्ही नसतो. कारण लेक शाळेतून घरी यायच्या आत मला घरी पोचायचं असतं. श्रृती घरी आली तिचा चिवचिवाट चालू होतो. आज ती कुणाजवळ बसली होती, कुणाच्या टीफिनमध्ये काय होते?, टीचर काय म्हणाल्या, नवीन डान्स / सॉंग शिकवलं असेल तर ते लगेच करून दाखवायचं असतं. मग काही खाऊन बाईसाहेब हातात रीमोट घेऊन पोगो, सी.एन्‌ वगैरे बघतात, अन्‌ मी एक डुलकी काढते.

श्रृतीचा होमवर्क वगैरे घेऊन मी भाजी आणायला, ‘वॉक’ ला जाते. परत आल्यावर संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू. अहो आले की त्याला काही खायला, चहा दिल्यावर श्रृतीचं जेवण, मग आमची जेवणे, नंतर उद्याच्या सकाळच्या स्वयंपाकाची तयारी!!!

बस्‌. लिहता लिहता मलाच कंटाळा आलाय. (हे इथपर्यंत वाचत येणार्‍यांच्या सहनशक्तीला मी दाद देते.)

तेचsss ते …तेचsss ते …तेचsss ते …तेचsss ते …तेचsss ते …तेचsss ते …तेचsss ते …