बस (च)…..

“अगं हे काय प्रज्ञा, आज चालत? गाडी (पक्षी : स्कूटी) सर्व्हींसिंगला दिलीय कां?” किमान १५ जणांनी तरी हा प्रश्न गेल्या महिन्याभरात मला विचारला असेल…

त्याचं काय झालं की मागच्या महिन्यापासून ऑफिसला जाताना मी स्कूटी न नेता बसने जायला लागले. जेव्हा सुरवात केली तेव्हा सकाळी सकाळी माझ्या स्कूटीचे मागचे चाक पंक्चर झाले होते. ऑफिसला उशिर होत होता म्हणून मी मेनरोडपासून शेअर-रिक्षा पकडू असे ठरवले. आणि चक्क मेनरोडला पोचल्यापोचल्या २ मिनिटात सिटी बस आली…. अजून एक सांगायचे म्हणजे नाशिकला साधारण वर्षभरापूर्वी नविन सिटी बस आणल्यात. छान चकाचक, उभे राहण्यासाठी किंवा बसण्यासाठी ऎसपैस जागा आणि महत्वाचे म्हणजे बसमध्ये संयत आवाजात वाजणारा FM रेडीओ….अशा छान छान बस काही ठराविक रूटवर चालू केल्या आहेत…ऑफिसमधल्या बहुतेकजणींनी अशा बसने प्रवास करून काय मस्त बस आहे, बसमध्ये किती छान वाटतं, मस्त गाणी ऎकत आपला स्टॉप कधी येतो ते कळतच नाही… असं सांगून सांगून मला जळवलं होतं… आणि तशातलीच एक छान बस माझ्यासमोर आल्यावर मी संधी दवडली नाही आणि बसने ऑफिसला जायचे ठरवले…मग तिकिट काढताना कळले की बसचा प्रवास किती economical आहे ते…..उतरताना कळाले की अरे, आपल्या ऑफिसच्या दारात तर बसचा स्टॉप आहे … त्यादिवसापासून ठरवूनच टाकले की आता रोज बसनेच ऑफिसला जायचे….

इतकी वर्षे बाहेर कुठेही जायचं असलं तरी स्कूटीशिवाय माझं प्रस्थान व्हायचं नाही… साधं कोपर्‍यापर्यंत जायचं असलं तरी स्कूटी… ही सवय मला मोडायचीच होती. मग मी घेतलेला, किमान ऑफिसला तरी बसनं जायचं हा निर्णय योग्य कसा आहे ते मलाच पटवणारी काही कारणं मी शोधलीयत्….

१. पेट्रोलचे भाव किती वाढलेत… आता एकट्याला जाण्यासाठी स्कूटी परवडत नाही.

२. बसचा स्टॉप ऑफिसच्या अगदी दारातच आहे.

३. घरून जाताना बसच्या स्टॉपपर्यंत जरी चालावे लागले तरी फक्त ५ ते ७ मिनिटेच चालावे लागते. चालणं आरोग्यासाठी, फिटनेससाठी चांगलंच…

४. ‘परिघ’ हळूहळू आकुंचन पावतोय हे लक्षात येतंय्…. ५ ते ७ मिनिटे चालल्यावर एवढा परिणाम मग ऑफिसला चालतच जाऊ कां?

५. स्कूटीने जायला १० मिनिटे लागतात तर बसने १५ …. ठीक आहे … फार काही फरक नाही…. इतर मोठ्या शहरातल्या लोकांना तर ३० ते ४५ मिनिटांचा ट्रॅव्हल करून ऑफिसला जावे लागते… त्यामानाने मी किती सुखी आहे…

६. परत येताना बहुतेकदा बस उशिरा येते. पण स्टॉपवर नुसतं थांबलं तरी इतरांच्या गप्पा ऎकण्यात छान वेळ जातो… आणि माझ्या ऑफिसच्या जवळच्या स्टॉपवर खूप कॉलेजचे , शाळेचे विद्यार्थी असतात, त्यांच्या गप्पा ऎकणं हा मस्त टाईमपास आहे.

७. जरी कुणाच्या गप्पा नाही ऎकू  आल्या तरी येणार्‍याजाणार्‍यांचं निरिक्षण करण्यात , त्यावरून काही तर्क बांधण्यात छान वेळ जातो… (सध्या मी ‘संपूर्ण शेरलॉक होम्स’ वाचतेय्… त्यामुळे असं निरिक्षण करण्याची , त्यावरून तर्क करण्याची खोड लागलीय…)

८. येताजाताना वाटेतली काही कामं करायची असतील तर स्कूटी बरी पडते. असा विचार मनात आल्याक्षणीच कायकाय कामं करायची असतात याची लिस्टच काढली. पेट्रोल भरणे, भाजी / फळं / वाणसामान आणणे, श्रृतीच्या शाळेत टीचरला भेटायला जाणे, वगैरे…नंतर लक्षात आलं की यातली बरीचशी कामं ऑकेजनली करावी लागतात…काही कामं घरी येऊन नंतर केली तरी चालतात. त्यामुळे या कारणासाठी बसने जाणं रद्द करायची गरज नाही. फारतर अशा एखाद्या वेळेस स्कूटीनं जाऊ…

९. आता पावसाळ्यात तर स्कूटीपेक्षा बसने जाणं केव्हाही चांगलं…. एकतर नव्या बसेस गळक्या नाहीयेत्‌… स्कूटीवरून पावसात जायचं म्हणजे गाडी स्लो चालवावी लागते नाहीतर गाडी स्लीप होण्याचे चान्सेस जास्त… तो रेनकोट घाला , काढा हा वैताग …घरून निघताना पाऊस नाही म्हणून रेनकोट घातला नाही आणि थोड्ं पुढे गेल्यावर पाऊस लागला तर वाटेत कुठेतरी गाडी थांबवून रेनकोट घालावाच लागतो…हा प्रकार मलातरी वैतागवाणा वाटतो… (आता जरा जास्तच असं वाटू लागलंय्…)

१०. जरा चार लोकांमध्ये मिसळता येतं.. बसमधून ये-जा करताना तर काही काही नमुने भेटतात… मग परत माझ्यातला शेरलॉक होम्स जागा होतो….

११. बसची वाट पहाण्यामुळे पेशन्स वाढतो… पेशन्स इज अ ग्रॆट स्ट्रेंग्थ यु नो… माझी चिडचिड हल्ली कमी झालीय् वाटतं….  

१२. आणि सर्वात महत्वाचे कारण – होता होईल तितका पर्यावरण रक्षणाला हातभार लावता येतो. माझ्या स्कूटीचं PUC आहे हो!! पण स्कूटी न नेता बसने गेले तर तेवढीच पेट्रोल बचत पर्यायाने उर्जा बचत आणि ०.००००००१% ने का असेना , प्रदुषण कमी….आणि तेवढाच पर्यावरण रक्षणाला हातभार…. आपण काही ‘Go Green’, ‘Green India’ , ‘Save Trees’ असा जागतिक संदेश देणारे टि-शर्टस्‌ घालून पर्यावरणाचे रक्षण करा असे सांगायला डोल्लेशोल्ले असणार्‍या अभिनेत्यासोबत रॅम्पवर नाही चालणारोत… तेव्हा कृतीतून पर्यावरणचे रक्षण केलेले चांगलें … कसें? (पुणेरी स्टाईलमध्ये अनिनासिक स्वरात ‘कसें’ हा शब्द वाचला तर या मुद्याचे महत्त्व जास्त कळेल…)

 बघा एवढे सारे फायदे मला जाणवले… ते ही एका महिन्यांत…. मग योग्यच आहे बसनं जाणं येणं…

चला बाय् बाय्… बसची वेळ झालीय्…

नेटवर्किंग डिव्हायसेस

 

नेटवर्कचे प्रकार कोणते ते आपण मागच्या लेखात पाहिले.

LAN , MAN , WAN हे प्रकार नेटवर्क किती जागेमध्ये तयार केले आहे त्यावरून आले आहेत. नेटवर्कमध्ये संदेशवहनासाठी कोणते माध्यम वापरले आहे त्यावरून नेटवर्कचे वर्गीकरण केले जाते.

. इथरनेट नेटवर्क यामध्ये कॉपर केबल वापरून नेटवर्क केले जाते. यात इलेक्ट्रीसिटी सिग्नलच्या माध्यमातून संदेशवहन केले जाते.

. वायरलेस नेटवर्क यामध्ये रेडिओतरंगाच्या माध्यमातून संदेशवहन केले जाते.

. फायबर ऑप्टिक नेटवर्क यामध्ये फायबर ऑप्टिक केबल वापरून नेटवर्क केले जाते . यामध्ये प्रकाशलहरींच्या माध्यमातून संदेशवहन केले जाते.

कोणत्याही ठिकाणी नेटवर्क तयार करण्यासाठी गरज असते ती वेगवेगळ्या प्रकारच्या उपकरणांची ज्याला नेटवर्किंग डिव्हायसेस असे म्हंटले जाते. नेटवर्किंग डिव्हायसेस कोणती , त्यांचे प्रकार , उपयोग यांची माहिती या लेखातून आपण घेणार आहोत.

. नेटवर्क कार्ड आपला संगणक नेटवर्कला जोडण्यासाठी याचा उपयोग होतो. यालाच LAN card , LAN adapter अशी वेगवेगळी नावे आहेत . नेटवर्क कार्ड वेगवेगळ्या प्रकारची असतात जसे की इथरनेट’ LAN कार्ड , वायरलेस LAN कार्ड , फायबर ऑप्टिक कार्ड इ.आपण कोणत्या प्रकारचे माध्यम वापरणार आहोत त्यावर कोणते कार्ड वापरायचे हे अवलंबून आहे.

. नेटवर्क केबल कॉपर केबल आणि फायबर ऑप्टिक केबल हे यात मुख्य प्रकार असून कॉपर केबलच्या जाडीवरून UTP , STP, co-axial असे वेगवेगळे उपप्रकार आहेत. यापैकी UTP या प्रकारची cat 5 किंवा cat 6 ही केबल इथरनेट LAN मध्ये वापरली जाते.

. रीपीटर कॉपर केबल वापरून जेव्हा संदेशवहन केले जाते तेव्हा त्यामध्ये असणार्‍या resistance मुळे हा संदेश विशिष्ट अंतर पार करून गेल्यावर कमजोर होतो व त्यामुळे destination ला संदेश योग्य रितीने मिळत नाही. त्यासाठी रीपीटर हे उपकरण सिग्नलची stength वाढवायला मदत करते.

. हब ,ब्रिज दोनपेक्षा जास्त संगणक जोडण्यासाठी पूर्वी हे उपकरण वापरले जायचे. पण यामार्फत होणार्‍या संदेशवहनाचा वेग खूपच कमी म्हणजे ४ ते १६ Mbps इतका असतो.

.  स्वीच दोनपेक्षा जास्त संगणक जोडण्यासाठी हे उपकरण सध्या वापरतात. यामध्ये ८ पोर्ट, १६ पोर्ट , १२० पोर्ट असे बरेच प्रकार आहेत.यामुळे आपल्याला १०० ते १००० Mbps इतका वेग संदेशवनासाठी मिळू शकतो. तसेच Configurable switch वापरून आपण Virtual LAN तयार करू शकतो.

. राऊटर दोन किंवा जास्त वेगवेगळ्या प्रकारच्या नेटवर्कमध्ये संदेशवहन करण्यासाठी राऊटर वापरणे गरजेचे आहे. सिस्को, ज्युनिपर, सॅमसंग यासारख्या कंपन्या राऊटर तयार करतात.

. अ‍ॅक्सेस पॉइंट इथरनेट नेटवर्क आणि वायरलेस नेटवर्क यांना एकत्र जोडण्यासाठी हे उपकरण वापरतात.

कोणत्या ठिकाणी कोणत्या प्रकारची नेटवर्किंग डिव्हायसेस वापरावी लागतील हे आपण कोणत्या प्रकारचे नेटवर्क तयार करणार आहोत यावर अवलंबून आहे. उदा. जर आपल्याला इथरनेटया प्रकारचे LAN तयार करायचे असेल तर UTP या प्रकारची केबल , ‘इथरनेट’ LAN कार्ड , स्वीच असे डिव्हायसेस वापरावे लागतात , तर वायरलेसया प्रकारचे LAN तयार करण्यासाठी वायरलेस LAN कार्ड , अ‍ॅक्सेस पॉईंट असे डिव्हायसेस वापरावे लागतात . थोडक्यात आपल्या गरजेनुसार कोणत्या प्रकारचे LAN तयार करायचे आहे ते ठरवून प्रथम त्याचा लेआऊट काढून घ्यावा लागतो. नंतर डिव्हायसेसच्या गरजेनुसार त्यांची जागा ठरवून घ्यावी लागते. आणि नंतर LAN चा सेटअप तयार करावा लागतो.

सर्व images गुगलकडून साभार

सर्व images गुगलकडून साभार