आया मौसम ‘शादीयों’का…..

 
दिवाळीनंतर तुलसीविवाह झाला की लग्नाचे मुहूर्त चालू होतात. एव्हाना या ‘सीझन’ मध्ये ज्यांची लग्नं होणार आहेत त्यांची गडबड चालू झाली आहे-वाणसामान व इतर खरेदी, लग्नाची खरेदी, निमंत्रकांची यादी करणे, निमंत्रणे पाठवणे इ. इ. आणि ज्यांची लग्नाची ‘प्रोसेस’ चालू आहे पण अजून काही ‘फायनल’ झालं नाही, त्यांचीही वेगळीच धांदल!!
 
एकूणच हे सगळं पाहताना असं वाटतं की आजची पिढी खूप ‘चूझी’ झालीय. जोडीदार कोण, कसा, कुठे स्थाईक होणारा (भारतात की परदेशात) याबाबत एकदम स्पष्ट मते असणारी आहे. माझ्या लग्नाला दहा(च) वर्षे झालीयेत पण त्या दहा वर्षात लग्नाळू पिढीच्या मानसिकतेत पडलेला फरक प्रचंड आहे. (हे असं पिढी वगैरे म्हंटलं की उगाचच म्हातारं झाल्यासारखं वाटतं.) माझं ‘अरेंज्ड मॅरेज’ आहे. पण तेव्हा जोडीदार कसा असावा याबाबत फार विचार केला नव्हता. (आणि महत्वाचं म्हणजे त्याचा आता बिलकूल पश्चाताप होत नाहीय्‌.) सर्व जबाबदारी आई-बाबांवर दिली होती. ‘मुलाचं कर्तृत्व पाहायचं, तो किती हिंमतीचा आहे हे महत्वाचं, बाकी इतर गोष्टी दुय्यम महत्वाच्या आहेत.’ हे लक्षात ठेवून ज्या मुलाला पाहील्यावर ‘क्लीक’ झालं त्याला हो म्हंटलं आणि डोक्यावर अक्षता पडल्या. ‘पाण्यात पडलं की आपोआप पोहायला येतं’ यावरच्या विश्वासाने पुढं जायचं बळ आणि शक्ती-युक्ती दिली.

नुकतंच आमच्या नात्यात एक लग्न झालं. त्यावेळी ‘वधूसंशोधनाच्या’ निमित्ताने बरेच धक्के मिळाले. आजच्या मुलींच्या किती अपेक्षा असतात.! मुलाचं दिसणं, शिक्षण, पगार, लग्नानंतर एकत्र कुटंबात राहायचं की वेगळं, कुणाचा पगार किती खर्च करायचा, नवर्‍यानं घरकामात मदत किती करायला हवी,हॉटेलिंग आठवड्यातून कितीदा व्हायलाच हवं अशा बर्‍याच गोष्टींवर ठाम मतं असतात. त्या अपेक्षा पूर्ण होईपर्यंत कितीही थांबायची तयारी असते. मुलांचंही तसंच. मुलीचं दिसणं, शिक्षण, पगार, परदेशात स्थायिक होण्याची मानसिकता आणि त्यादृष्टीने तयारी (पासपोर्ट,खाणं,पिणं,ड्रेस-सेन्स वगैरे) आहे कां, असे बरेच ‘क्रायटेरियाज्‌’ ठरलेले असतात. अ‍ॅडजेस्टमेंट कुणी आणि कां करायची हा महत्वाचा मुद्दा असतो. हे सगळं पाहिलं की वाटतं ‘अरे,आपण किती डोळे मिटून संसारात उडी घेतली’. एका लग्नाळू मुलीच्या आईकडून ऎकलं, “आम्ही सगळी जबाबदारी मुलीवर दिलीय्‌. स्वतःचं भलंबुरं कळण्याइतपत ती मोठी झालीय्‌. आम्ही काही ठरवलं आणि त्यातून चुकून काही वाईट झालं तर सगळं खापर आमच्यावर येणार, त्यापेक्षा तुझं तू ठरव, आम्ही तुला ‘सपोर्ट’ करू” ऎकून मी अवाक्‌ झाले होते. एक लग्नाळू मुलगा म्हणाला, “मी आई-बाबांनी ठरवलेल्या मुलीशीच लग्न करणार. कां तर पुढं तिचं-त्यांचं पटलं नाही तर मी मध्ये येणार नाही. तुम्हीच मुलगी ठरवलीय्‌, तुम्हीच निस्तरा….” धक्का बसला होता हे ऎकून!!.
 
 लग्न ही केवळ सुरवात असते. संसार हा परस्पर सहकार्य, सामंजस्य, प्रेम, विश्वास यावरच तरून जातो. सॅलरी, जॉब प्रोफाईल, टर्म्स आणि कंडीशन्स ठरवायला हा काही कंपनीतला जॉब नाही. पूर्ण आयुष्यभराशी निगडीत ही संकल्पना आहे. परस्पर सहकार्य, सामंजस्य, प्रेम, विश्वास असेल तर कोणत्याही कठीण परिस्थितून मार्ग निघतोच. फक्त तशी मानसिक तयारी असणं आणि मनापासून प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. काय चूक, काय बरोबर हा मुद्दाच नाहीय्‌. परिस्थितीनुसार विचारांत, अपेक्षांत बदल होत असतो. आखिर ये शादी का लड्डू है. जो खायें वो पछतायें, जो ना खायें वो भी पछतायें….. 

रिक्षा/व्हॅन वाले काका

 

माझी शाळा घरापासून बर्‍यापैकी जवळ होती. त्यामुळे आम्ही सर्व मैत्रिणी मिळून चालत शाळेला जायचो. तेव्हाही रिक्षामधून शाळेला येणार्‍यांबद्द्ल कुतुहल असायचे. स्कूल बस हा प्रकार काही निवडक इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून उपलब्ध असायचा. 

आता शाळा घरापासून लांब किंवा जवळ असली तरी बहुतेक सर्व मुले रिक्षा, व्हॅन किंवा स्कूलबसमधून शाळेला जात असतात. या मुलांचा एक ग्रुप तयार झालेला असतो. वेळेअभावी श्रृतीला मी रोज शाळेत नेऊआणू शकत नाही म्हणून या वर्षी व्हॅन लावली आहे. व्हॅन / रिक्षावाल्या काकांबरोबर या मुलांचं एक वेगळंच नातं तयार झालेलं असतं. आज आईनं डब्यात काय दिलंय इथपासून टीचर, स्कूलमधले फ्रेंडस्‌ काय म्हणाले इथपर्यंत या काकांबरोबर गप्पा होत असतात. प्रत्येक वर्षी स्कूलच्या शेवटच्या दिवशी या काकांकडून त्यांच्या रिक्षा / व्हॅन मधल्या सर्व मुलांना छोटीशी गिफ्ट व मुलांचा आवडता खाऊ (कुरकुरे, कॅडबरी) वगैरे असतो. तिचे व्हॅनकाका रोज सकाळी गणपतिस्त्रोत्र, हनुमानस्त्रोत्र, रामरक्षा अशा कॅसेटस्‌ लावत असतात. मी त्यांना म्हंट्लं, “काका, तुम्ही व्हॅनमध्ये स्त्रोत्रं , श्लोक वगैरे लावता ते खूप छान वाटतं. त्यानिमित्ताने मुलांची सकाळ प्रसन्न होते.” ते म्हणाले, “हो तर. ऎकून ऎकून मुलांचे श्लोक पाठ होतात. मी गाडीत FM वगैरे कधीच लावत नाही.”  

एके दिवशी श्रृतीनं मला ऑर्डर सोडली, “आई, मला एक व्हाईट पेपर अ‍ॅन्ड ब्लू स्केचपेन दे. व्हॅनमधली एक ताई मला ग्रिटींग करायला शिकवणार आहे.”(रच्याक – या वयाच्या मुलांची भाषा हा एक वेगळा विषय आहे. एका वाक्यात मराठी, हिंदी, इंग्रजी अशी सगळी सरमिसळ असते).वेगवेगळ्या वयाच्या मुलांबरोबर कसं जुळवून रहायचं हे मुलं इथं शिकतात. मला तरी असं वाटतं की शाळेत जाण्याआगोदरची मुलांची मानसिक तयारी ही या व्हॅन किंवा रिक्षात होत असते. म्हणजे घरातून आईला सोडायला नाराज असणारं मुल, व्हॅन किंवा रिक्षात आपल्या मित्रांच्या साथीत खुलतं आणि आनंदात हसत शाळेत जातं. 
 
काही खुलासे –
१.    रच्याक हा By The Way चा मराठी अनुवाद आहे.
 २. इथे स्कूलबस किंवा त्याच्याशी निगडीत इतर गोष्टींचा उल्लेख नाही, कारण त्याचा अनुभव नाही. 

 

 

प्रोत्साहन (अर्थात Motivation)

 
मागचा पूर्ण महिना मला ब्लॉगवर एकही पोस्ट टाकता आली नाही. आमच्या ऑफिसमध्ये सर्वांना intranet मध्ये वापरण्यासाठी email ID तयार करायचे काम माझ्यावर सोपवले होते. ते करण्यासाठी कायपापड बेलावे’ लागले ते पुढे येईलच पण त्या आधी याविषयाची थोडीशी ओळख करून देते.
 
आपण नेहमी मेल पाठवण्यासाठी याहू , जीमेल , रेडीफ या सुविधा वापरतो. त्यासाठी इंटरनेट कनेक्शन असणे गरजेचे आहे. आम्हाला इंटरनेट कनेक्शन वापरता intranet म्हणजे कंपनीच्या अंतर्गत वापराकरता मेल सुविधा द्यायची होती. त्यासाठी Microsoft Exchange Server 2007 हे मायक्रोसॉफ्टचे उत्पादन मेल सर्व्हर म्हणून वापरायचे ठरवले

मला सुरवात पासून करायची होती. कारण Microsoft Exchange Server 2007 हे नांव ऎकून होते पण त्याचं installation किंवा administration कधीही केले नव्हते, किंवा याच्याशी संबधित पुस्तकंसुध्दा आमच्याकडे नव्हती. आणि महत्वाचे म्हणजे आमच्याकडे Exchange Server 2007 चा setup नव्हता. मग गूगलदादांच्या मदतीनं आधी installation कसे करायचे याची माहीती मिळवली. जी माहिती मिळली त्यातून असे कळाले की server operating system , domain controller , IIS server , .net framework 3.0 अशा एकूण १० बेसिक गोष्टी होत्या की ज्या आधी install कराव्या लागणार होत्या. मगच Microsoft Exchange Server 2007 चे installation होऊ शकत होते. मी या सगळ्या गोष्टींच्या requirment चे एक proposal सरांना सादर केले आणिमाझ्या कोर्टातला बॉल ऑफिसच्या कोर्टात’ ढकलला. आता मला setup मिळाला की काम पुढे चालू होणार…. चला मी सुटले….. 

घरी जाऊन नवर्‍याला सांगितलं “आमच्याकडे हे असंच असतं फक्त जबाबदारी द्यायची , काम पूर्ण करण्याची target date द्यायची पण मदत मात्र काही नाही. मी सरांना सांगितलंय जोपर्य़ंत मला setup , books मिळत नाही तोपर्य़ंत मी पुढे जाऊ शकणार नाही.” नवर्‍यानं माझ्याकडे पाहीलं , तो म्हणाला “प्रज्ञा, हे सर्व दिल्यानंतर कुणीही intranet चा email server करू शकेल . कारणं देऊन तू जबाबदारी टाळू शकशील पण तुझी growth सुध्दा थांबेल. तू नवीन शिकू शकणार नाहीस. पण जर तू नेटाने , सर्व अडचणींवर मात करून हे काम पूर्ण केलेस तर तुझा आत्मविश्वास वाढेल. तुला हे काम सांगितलंय मग तू solution घेऊन जा. Don’t give excuses , Don’t give reasons , Just say ‘Yes’ or ‘No’ . मला माहितीय्‌ तुला ‘नाही’ म्हणायला आवडणार नाही……” असं जबरदस्त मोटिव्हेशन मिळाल्यावर परत प्रयत्‍न चालू केले.
 
 त्यादरम्यान Microsoft च्या वेबसाईटवरून Exchange Server 2007 चं Microsoft press चं पुस्तक आणि Exchange Server 2007 चा setup खरेदी केले , ते हातात मिळायला दिवस लागले. मग बरेच प्रयत्‍न करून Exchange Server 2007 चे Installation यशस्वीपणे केले. मग चालू झाली त्यावर  R & D आणि Testing. सर्व employees चे आमच्या डोमेनचे email Id तयार केले. बाकिच्यांना Microsoft outlook 2007 कसं configure करायचं , वापरायचं याचे training दिले. आता intranet email व्यवस्थित चालू आहे. हे सर्व शक्य झालं strong motivation मुळे.!!! काम यशस्वीपणे पुर्ण केल्याचा आनंद तर आहेच पण नवनवीन जबाबदार्‍या स्विकारण्याचा आत्मविश्वासही मिळालाय्‌. Thank you RAVI . Thanks a lot.!!!!!!  
ता. – Actually, हा लेख , मी नवीन पान म्हणून २५/०९/२०१० ला टाकला होता. पण आता जरासा बदल केलाय्‌. आता पूर्वीचे पान हे पोस्ट म्हणून टाकलेय्‌. व `Mictosoft Exchange Server 2007′ च्या पानात बदल केलेत.