अलविदा २०१०

 

वर्ष संपण्याचा माहौल मागच्याच आठवड्यापासून चालू झाला होता. वर्तमानपत्रांचे जे स्तंभ या वर्षापुरतेच होते, त्यांचे लेखक रजा घेऊ लागले होते. पुर्ण वर्षात काय कमावले , काय गमावले याचा आढावा वर्तमानपत्रांतून येऊ लागला की वर्ष संपत आल्याची जाणीव होऊ लागते. घोटाळे उघडकीला येण्याचे, शेअर बाजारात प्रचंड उलाढालीचे (हे नवर्‍याचं ऎकून हं), नाशिकची ५ डिग्री से. ची थंडी अनुभवण्याचे हे वर्ष संपले. आपल्याही मनात चालू होतं नां की हे वर्ष किती लवकर गेलेकिंवा खूप खूप हळूहळू गेले हे दिवसवगैरे .(इंग्रजी वर्ष (जाने ते डिसें) की मराठी (चैत्र ते फाल्गुन) या वादात न पडता कॅलेंडर वर्ष असं मानू.) 

 
खरंतर मला असं वाटतं की आपल्या मनाप्रमाणे, ठरवल्याप्रमाणे किंवा न ठरवता चांगल्या गोष्टी घडल्या, तर दिवस खूप पटापटा जातायत असं वाटतं. आणि जर तसं काही झालं नाही तर खूप रटाळवाणं , संथ वाटत राहतं. आज सकाळीच आम्ही सगळे गप्पा मारत होतो, तेव्हा सासरे म्हणाले, ‘निम्मं वर्ष चांगलं गेलं, पण दिवाळीनंतर दिवस जाता गेले नाहीत’ . तसं तर प्रत्येक दिवसाचे तास २४ च असतात. मग तो दिवस वेगवान जाणं किंवा संथ जाणं हे आपल्या मनःस्थितीवर अवलंबून असतं. दिवाळीनंतर बाबांच्या तब्येतीच्या तक्रारी चालू झाल्या, त्यामुळे त्यांना ते दिवस कंटाळवाणे वाटले असावेत.

मला तर हे वर्ष कसं चालू झालं, कसं संपलं हेच कळालं नाही. श्रृतीचा वाढदिवस जानेवारीत असतो. डिसेंबरमध्ये मला असं वाटत होतं की अरे, आत्ताआत्तातर श्रृतीचा वाढदिवस झाला, एक छान गेटटूगेदर झालं आणि इतक्यात डिसेंबर आला पण!!’ श्रृतीचं नवीन शाळेत अ‍ॅडमिशन, ‘अहोंचं प्रमोशन याच वर्षात तर झालं. माझं नवं घर वर्ड्प्रेसवर याच वर्षी चालू झालं. तन्वी, महेंद्रजी, हेरंब, सुहास, जयश्रीताई, भाग्यश्रीताई, हेमंत, विभाकर, देवेंद्र, रोहन, सुहास, नचिकेत अशा कितीतरी नवीन ओळखी झाल्या. जे Exchange Server शिकायचं असं मी गेल्या कित्येक वर्षांपासून ठरवत होते, ते यावर्षी शिकले, successfully implement केले. तशा बर्‍याच गोष्टी मनासारख्या झाल्या नाहीत, पण त्रासदायक क्षण विसरून, चांगल्या आठवणी सोबत घेऊन पुढची वाटचाल करणे हेच तर आयुष्य असतं. खरंतर ३१ डिसेंबरला सूर्य मावळून १ जानेवारीला सूर्य उगवणार. म्हणजे बाकीच्या दिवसांसारखाच हा एक दिवस. पण तरी अवलोकन करण्यासाठी या दिवशी मी आर्वजून वेळ काढते. काय केलं, काय मिळवलं यापेक्षा कोणत्या चुका केल्या आणि त्या कशा टाळायला हव्यात , जगणं अजून कसं समृध्द करता येईल याचा ताळा काढते. (माझा नवरा तर मला अधूनमधून असा विचार करत जा असं सांगत असतो.असो)

नवीन वर्षाचा संकल्प, आजच्या भाषेत New Year Resolution मी काही ठरवत नाही, कारण जर त्याप्रमाणं काही झालं नाही तर उगाचच चूटपूट लागत राहते. पूर्वी शाळाकॉलेजात असताना नवीन वर्षात डायरी / रोजनिशी लिहायची असं ठरवायचे, पण त्या नवीन डायरीची फारतर ८१० पानं भरल्यावर पुढे रांगोळ्या, चित्रं, आवडलेल्या लेखाचे उतारे, चारोळ्या असं काहीबाही लिहलं यायचं आणि वर्षाच्या शेवटी अशी काही डायरी होती हे शोधावं लागायचं. (‘गजनीमध्ये आमीरची रोजनिशी पाहिल्यावर आपणसुध्दा डायरी लिहायला हवी असं वाटलं होतं. पण आपण काही बडे उद्योगपती नाही की दर दिवशी काही वेगळे घडेल आणि मी ते डायरीत टिपून ठेवेन. त्यामुळे तो विचार तिथेच थांबला. असो.)

नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा. येणारे वर्ष सर्वांना आनंदाचे, आरोग्याचे, भरभराटीचे आणि मनोकामना पुर्ण करणारे जावो हीच सदिच्छा.

तर भेटूच नवीन वर्षात.

 

मन सुद्द तुजं……..

 
लहान मुले आपल्याला कळत नकळत बरेच काही शिकवून जात असतात. त्याचाच अनुभव काल आला.

श्रृतीनं काल तिचा डबा शाळेत संपवला नव्हता, परवा दिवशी पण थोडा डबा शिल्लक होता. म्हणून मी तिला म्हंटले “काय ग श्रृती, टिफीन फास्ट फास्ट फिनिश करायचा नाही कां ? तुझा टिफीन शिल्लक कसा काय राहतो?” यावर तिनं जे काही उत्तर दिलं ते तिच्याच भाषेत सांगते. “अगं आई, ती सार्या आहे नां, माझी फ्रेंड, तिला शू आली होती टिफीन रिसेस मध्ये, मग मला तिला टॉयलेट्पर्यंत सोडायला जावं लागलं . मग मी परत आल्यावर फास्ट फास्ट टिफीन खाल्ला पण थोडा राहिला.” मी पूर्णपणे गोंधळात पडले. मनात विचार केला की ही सार्या एकटी कां नाही टॉयलेट्ला गेली? मी तसं श्रृतीला विचारलं. तर ती म्हणाली, “अगं आई, सार्या नां छोटी आहे.” “म्हणजे? ती तुझ्याच क्लासमध्ये आहे नां?”. “हो गं, पण तिचे पाय छोटे आहेत, मग तिला स्टेप्सवर चढताना दोन्हीकडून धरावं लागतं. मग मी आणि रिद्धी तिला घेऊन टॉयलेट्ला गेलो”. मला लक्षात आलं की, तिच्या मैत्रिणीच्या पायात काही दोष असणार आहे. तिला जिना चढता येत नाही. या सगळ्याजणी टिफीन खायला ग्राउंडवर जातात. सार्याला सोडण्यासाठी श्रृती आणि तिची मैत्रिण रिद्धी पहिल्या मजल्यावरच्या ज्युनिअरसाठीच्या टॉयलेट्पर्यंत गेल्या होत्या. (तिथे मावशी असतात मदत करायला.) मला श्रृतीचं इतकं कौतुक वाटलं !!!. आपला टिफीन तसाच अर्धवट सोडून ती मैत्रिणीला मदत करायला गेली होती. मग मी तिला मुद्दाम विचारले, “तुला टीचरनी तिची मदत करायला सांगितली होती कां?”, “नाही गं, मला तिची हेल्प करायला आवडतं, ती माझी फ्रेंड आहे नां!!”. मला खूप भरून आलं. मी तिला फक्त एवढंच म्हणू शकले, “व्हेरी गुड, माय बच्चा. अशीच सगळयांना मदत करत जा”.

जराही कुरकुर, तक्रार न करता, कोणताही ‘मी हे केलं’ असा गर्व न ठेवता, कुणीही न सांगता श्रृतीनं आपणहून मदत केली. मला खरंच तिचा खूप खूप अभिमान वाटला.