पॅकेज…..

 

वेगवेगळ्या कंपन्या , मोठ्मोठे शॉपिंग सेंटरस्‌ यांनी देऊ केलेले बर्‍याच प्रकारचे पॅकेजेस्‌ आपण ऎकतो. उदा. मोबाईल कंपनी जी ‘हॅडसेट्वर सिम कार्ड’ फुकट असे पॅकेज देते. किंवा एखादे फर्निचरचे दुकान जिथे बेडरूम सेट बरोबर ड्रॆसिंग टेबल फुकट असे पॅकेज मिळते…. थोडक्यात काय तर निरनिराळ्या प्रकारच्या ग्राहकांना आपल्याच दुकानात खरेदी करण्यास आकर्षित करण्यासाठी निरनिराळ्या प्रकारची पॅकेजिस्‌ देऊ केली जातात. आपला बिझनेस वाढणे हा एकमेव उद्देश या वेगवेगळ्या ऑफर स्कीमस्‌ मध्ये असतो. अगदी नवीन जॉब जॉइन करतानासुद्धा जी कंपनी चांगले ‘सॅलरी’ पॅकेज देते ती बहुदा स्विकारली जाते.

सध्या नाशिकच्या मात्तबर अशा वृत्तपत्रांमधून एक ‘पॅकेज’ देणारी जाहीरात येत आहे , तीही नाशिकमधल्या ख्यातनाम अशा हॉस्पिटलकडून!!! चक्रावलात नां? खरंय्‌….नाशिकमधल्या एका ‘स्पेशालिटी’ हॉस्पिटलकडून एक ‘पॅकेज’ दिलंय्‌ …ते ही ‘अ‍ॅंजिओप्लास्टीसाठी’……. आमच्याकडे ‘अ‍ॅंजिओप्लास्टी’ केली तर ‘अ‍ॅंजिओप्लास्टीचा खर्च , ३ दिवसांचा हॉस्पिटलमधला निवास (१ दिवस ICU , २ दिवस AC room) , दिवसातून ७ वेळेस आहारातज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आहार , औषधोपचारांचा खर्च (याला * मार्क आहे… अर्थात अटी लागू….) आणि….१८ महिन्यांची ‘वॉरंटी’……अजून बर्‍याच गोष्टी आहेत , काहींना * मार्क आहे… हे सर्व फक्त ९५००००/- मध्ये…… हे वाचल्यावर कोणत्याही सामान्य माणसाला काही प्रश्न पडू शकतात. जसे…

१. ऑफर आहे तोपर्यत अ‍ॅंजिओप्लास्टी करून घ्यावी कां? (गरज  आहे की नाही हा भाग वेगळा!!)
२. १८ महिन्यांची ‘वॉरंटी’ म्हणजे काय? (१८ महिन्यांनंतरच blockages होणार की १८ महिन्यांनंतर परत अ‍ॅजिओप्लास्टी करून घ्यावी लागणार?)


म्हणजे हे तर एखाद्या शॉपिंग मॉलसारखे झालं नां…. ग्राहकांना अर्थात पेंशंट्सना आपल्याच हॉस्पिटलमधून ‘अ‍ॅंजिओप्लास्टी’ करून घेण्यासाठी ऑफर….डॉक्टर हा देव आणि पेशंट्सचा आजार बरा करणे हा सेवाधर्म असा (पुरातन काळातील) विचार माझ्या मनात अजिबात नाही….. ‘डॉक्टरकी’ हा बिझनेस झाला आहे हे आतापर्यंत ऎकूनच होते, पण हॉस्पिटलसच्या अशा जाहीराती या बिझनेसबद्दल ओरडून सांगत असतात. थोडक्यात काय तर चकाचक हॉस्पिटल , ईतर उत्तम सोयी-सुविधा आणि मुख्य म्हणजे ‘पॅकेज ऑफर’ या गोष्टी महत्वाच्या आहेत. डॉक्टरस् ची गुणवत्ता , पेशंट्सची काळजी , ऑपरेशनसाठी वापरायची उपकरणे या दुय्यम गोष्टी आहेत…….

बालसंगोपन शास्त्र

 

पूर्वी एकत्र कुटुंबात बरीच मुलं एकत्र वाढायची. त्यामुळे लहान मुलाचे जाणीवपूर्वक ‘संगोपन’ केले नाही तरी चालायचे. माझी आई, सासूबाई म्हणतात तसं, मुलांत मुल वाढायचे. पूर्वी कसं ‘कार्ट्या / कार्टे , तुला एवढं कसं कळत नाही…..?’ ,‘चूप बस, फार अक्कल चालवू नकोस ’ , ‘तूला काय करायच्या आहेत नसत्या चौकशा?’ वगैरे मुलांना म्हणता यायचं, कारण ‘बालसंगोपनशास्त्र , बालमानसशास्त्र’ फार बोकाळलेलं नव्हतं. पण आजकाल असं करता येत नाही. ‘मुलांच्या शंकांचे नीट समाधान करावे…’ , ‘त्यांच्यापासून काही लपवून ठेवू नये..’, ‘मुलांशी मोकळा संवाद असावा..’ इति बा.सं.शा, बा.मा.शा….यामुळेच इतकी गाची होते , कोंडी होते की सांगता सोय नाही…..

श्रुति ४ वर्षाची (वय मुद्दाम सांगितलं आहे. पुढे त्याचा संर्दभ येणार आहे.) असताना , कपाटाचा कप्पा साफ करताना आमच्या लग्नाच्या फोटोचा अल्बम सापडला. फोटोचा अल्बम म्हणजे माझा ‘अशक्त बिंदू’ (मराठीत ‘वीक पॉइन्ट’)!!! मग काय लेकीला बरोबर घेऊन अल्बम पहायला सुरवात केली. त्यानंतर ‘आई , ही तू नां…. हे बाबा नां….? मी : ‘हो, रे, शोना.’ अधून मधून तिच्या बरेच कमॆंटस्‌ चालू होत्या आणि ’तो’ फोटो आला. त्यात माझ्या (तेव्हा होणार्‍या, आता झालेल्या) नवर्‍याच्या जवळ माझा भाचा, श्रेयस बसला होता. श्रुतिनं विचारलं ’आई, हा श्रेयसदादा आहे नां? मग मी कुठेय? मी फोटोत कां नाही?’ …..प्रश्नरूपी ‘बॉम्ब’ पडणे म्हणजे काय हे मला तेव्हा कळाले. गाची होणे , कोंडी होणे म्हणजे काय हे व्यवस्थित समजलं. त्यात बा.सं.शा, बा.मा.शा. डोक्यात पक्कं बसलेलं …. मग मी यथामती तिच्या प्रश्नांची ऊत्तरं द्यायचं ठरवलं…‘अगं, श्रेयसदादा पाहीलंस नां, किती छोटा आहे, मग तू कशी असशील? तू तेव्हा नव्हतीस…”. ‘नव्हते म्हणजे…?,मग मी कुठे होते?’ (तिचा स्वर असा होता की, माझ्या आई-बाबांचं लग्न…आणि मीच फोटोत नाही…. कसं शक्य आहे…?) ((“कार्टे, एकदा संगितलं नां, कळत नाही कां”)इति मी , मनातल्या मनात … कारण बा.सं.शा, बा.मा.शा. मला असं करू देत नव्हते.) शेवटी बा.सं.शा, बा.मा.शा. गंडाळून ठेवलं आणि तिला म्हंटलं, ‘अगं, काल रात्री बाबा आईस्क्रीम घेऊन आलेत. तू झोपली होतीस म्हणून तुझं आईस्क्रीम फ्रीजमध्ये ठेवलंय्‌. तुला हवंय्‌….?’ पोरगी तशी ‘समंजस’ आहे, लगेच तिचा प्रश्न , फोटोचा अल्बम वगैरे विसरून आईस्क्रीम खायला लागली…. मी ‘हुश्श्‌’ करून मोकळा श्वास घेतला.

२ वर्षानंतरची गोष्ट…. तीच मी, तीच श्रुति, तसाच प्रसंग….फक्त अल्बम वेगळा…. श्रुतिच्या लहानपणीचा ….त्यात नेमका माझ्या डोहाळजेवणाचा फोटो होता…माझ्या चौकस कन्येनं लगेच सांगितलं ‘आई, मी तुझ्या पोटात होते नां..?’ मी थक्क, सुन्न…परत एकदा बा.सं.शा, बा.मा.शा…..प्रेमानं (मनातल्या मनात ‘ह्रदय गोळा करून…आता काय ऎकायला मिळतंय्‌…’अशा आवाजात) तिला म्हंटलं ‘अरे वा !! तुला कसं कळालं. कसली हुशार आहेस गं तू…’ . कन्येनं ‘एवढं कसं कळत नाही तुला?’ अशा अर्थाचा एक कटाक्ष टाकला व मला समजावून सांगू लागली ‘आई, तेव्हा नाही का, केतकी मावशीचं पोट खूप मोठं झालं होतं, तू म्हणालीस की तिला बाळ होणार आहे ….. मग नाही का शांभवी झाली….आपण तिच्या बारशाला गेलो होतो….तसंच मी तुझ्या पोटात होते म्हणून तुझं पोट मोठं होतं….’. पुढचा कोंडीत पकडणारा प्रश्न यायच्या आधीच मी तिचं खूप कौतुक केलं. आणि सांगितलं ‘अगं, तुझे फ्रेंड्स तुला खेळायला बोलावतायत. पट्कन फ्रेश हो व खेळायला जा’ . यावेळी तिचे फ्रेंड्स माझ्या मद्तीला आले. ते नसते तर मॅगी , मि.बीन , छोटा भीम , टॉम – जेरी कोणीतरी मद्तीला आलेच असते………पोरं किती लवकर मोठी होतात नां…!! मला खात्री आहे, तिच्या पुढच्या प्रश्नांची उत्तरं ती लवकरच शोधून काढेल….(नाहीतर ‘३ ईडीयटस्‌’  आहेच मदतीला….!!!किमान एका प्रश्नाच्या उत्तरासाठीतरी……)

BTW,यात बा.सं.शा, बा.मा.शा. ला नावं ठेवण्याचा उद्देश अजिबात नाही….या बाबतीत हळव्या लोकांनी मनावर घेऊ नये. केवळ विनोदासाठी याचा आधार घेतला आहे. कृपया गैरसमज नसावा…..

पॅकिंगच्या प्रेमात

 

    

swiss chocolet (आंतरजालावरून साभार)

`अहोकालच ऑस्ट्रीयाहून आले. येताना नेहमीप्रमाणेच चॉकलेटस् , कॅडबरीज , बिस्किटस् घेऊन आले. आणि मी नेहमीप्रमाणेच परत एकदा `पॅकिंगच्या प्रेमातपडले. खरंच या पाश्चिमात्य लोकांकडून ही पॅकिंगची कला शिकायला हवी असे मला नेहमी वाटते. कोणतीही गोष्ट कशी नजाकतीने पेश करावी हे यांच्याकडून शिकावे. साधी कॅरॅमल घातलेली कॅडबरी!!! त्या कॅडबरीचा एक एक चौकोन छान सोनेरी , चंदेरी रंगाच्या कागदात ठेवून , वर परत पारदर्शक निळा, हिरवा, लाल असे कागद लावून एका मोठया बॅगमध्ये पॅक केलेले असतात. अशी कॅडबरी खायच्या आगोदर नजरेची तृप्ती होते मग रसनेची.   

swiss truffle (आंतरजालावरून साभार)

 असंच अजून एक प्रकारचं पॅकिंग. आपले अंडी ठेवायचे ट्रे असतात तसे एकदम छोटे (एक गोटी मावेल एवढा आकार) खळगे असलेला ट्रे , त्यात बाहेरून मऊ चॉकलेट, आतून कॅडबरी , त्याच्या आत एखादा सुका मेवा (अक्रोडचा तुकडा , काजूचा तुकडा , भाजलेल्या बदामाचा तुकडा) असं घालून त्याच्या अर्धचंद्राकृती कॅडबरी कम गोळ्या ठेवलेल्या असतात. या ट्रे वरून पातळ पारदर्शक कागद लावून खोक्यात (आपल्या मिठाईच्या खोक्यासारख्या) पॅक केलेलं असतं. पहायला खूप छान तर वाटतंच पण खायला तर `लई भारीवाटतं…….    

सगळ्यात बाहेरचे पॅकिंग - आवरण नं. ४

 तिकडे ख्रिसमसचं खूप जोरदार celebration असतं . त्यावेळी अहोनी एक मॅजिक एगम्हणून एक कॅडबरीचा मस्त प्रकार आणला होता. फोटोत दाखवलं आहे, तसं एक मोठं प्लास्टीकचं अंड ….त्यात गोल आकाराचे २ छोटे ट्रे . खालचा ट्रे मोठा त्यात ४ मॅजिक एग्ज’ , वरचा ट्रे छोटा त्यात ३ मॅजिक एग्ज’….. फोटोत दाखवलं आहे, तशी ७ अंडी होती……  

 त्यावरचा कागद काढला की आत अंड्याच्या आकाराचा बाहेरचं आवरण असलेली मिल्क कॅडबरी’…..(sorry, तिचा फोटो काढेपर्यंत ती शिल्लक राहिली नाही….) त्याच्या आतून चॉकलेटचे आवरण….. आणि ते अंड आतून पोकळ …. त्या पोकळीत फोटोत दाखवली आहे तशी छोटी डबी…..  

   

   

. 

   

 त्या डबीत फोटोत दाखवले आहेत तसे खेळाचे तुकडे….. 

  ते तुकडे जोडून तयार झालेले हे खेळणे……..   

 

   

 

  

 
मला त्यांची creativity आवडली…… चॉकलेट, तुकडे जोडून खेळ तयार करण्याचा आनंद याचं ते एक मस्त पॅकेज मिळालं….. असं मस्त पॅकिंग पाहिलं की खाण्याची आपोआप इच्छा होतेजेवताना नाही कां एखादा पदार्थ सुंदरपणे सजवून समोर आणला तर खावासा वाटतो……(‘चार आण्याची कोंबडी बारा आण्याचा मसालाअसं कोणी म्हंटलं कां ?…..)मला तरी पॅकिंग ही कला वाटते. सध्या आपल्याकडेही बऱ्याच गोष्टी छान पॅक करून मिळतात…. मध्ये मी एका साखरपुड्याला गेले होते. तिथे मुलाकडच्यांनी मुलीला घालायची अंगठी, एका कृत्रिम , मखमली गुलाबाचा आकार असणाऱ्या डबीतून आणली होती…..  

 

तर , moral of the लेख :- पाश्चिमात्यांच्या बऱ्याच गोष्टी आपण अंधानुकरण करत स्वीकारल्या आहेत तसं खरंच चांगल्या गोष्टी जसं पॅकिंगची कला वगैरे शिकून स्वीकारायला हव्यात…..