महाबलीपुरम्‌

ईकडे चेन्नईला बदली झाल्यापासून आमचे दर वीकेंडला कुठे ना कुठे भटकणे चालू आहे. पॉंडेचेरी (खरा उच्चार पुडुचेरी) , क्वीन्सलॅंड थीम पार्क , वेल्लोरचे गोल्डन टेंपल अशी काही चेन्नईच्या आसपासची ठिकाणे पाहून झाली आणि एका रविवारी महाबलीपुरम्‌ पाहून आलो. आपण जरी महाबलीपुरम्‌ असे म्हणत असलो तरी याचा स्थानिक उच्चार ममलापुरम्‌ असा आहे.
महाबलीपुरम्‌ म्हणजे शिल्पकृतींचे गाव आहे. बघावे तिकडे देवदेवतांच्या मोठमोठाल्या शिल्पकृती दिसतात. तिथे कृष्णकुंज म्हणून एक स्थान पल्लवाने तयार केले आहे. कृष्ण जन्मापासून कृष्णाच्या आयुष्यातले महत्त्वाचे प्रसंग जसे की कालिया मर्दन , गोवर्धन पर्वत हातावर उचलून घेणे, पांडवांच्या गुंफा हे सर्व प्रसंग तेथे अखंड अशा दगडामधून कोरून काढले आहेत. त्या अखंड अशा दगडावर एकूण १५३ शिल्पे कोरलेली आहेत. आणि प्रत्येक शिल्प हे कलाकुIMG_0891सरीचा उत्तम नमुना आहे.

कृष्ण याठिकाणी कधीच आला नव्हता पण चित्ररूपाने इकडच्या लोकांना महाभारत समजावण्यासाठी पल्लवाने हे सारे कोरीव काम सुमारे १४०० वर्षांपूर्वी केले आहे. पण पल्लव कोण होते आणि त्यांनी कृष्णकुंज करण्यासाठी याच ठिकाणाची निवड कां केली हे मात्र समजू शकले नाही. ( आमचा गाईड पल्लवाज्‌ म्हणून उल्लेख करत होता, म्हणजे मला तरी असं वाटतंय्‌ की पल्ल्वांच्या अनेक पिढ्यांनी येथे काम केले असावे.) तिथून थोडं पुढे गेल्यावर एक प्रचंड मोठी शिळा आहे , नैसर्गिकरित्या स्वतःला तोलून धरणारी ती शिळा अशा एका टोकावर उभी आहे की जरासा धक्का लागला तर ती कधीही खाली कलंडू शकेल असे वाटते. पण आमच्या गाईडच्या सांगण्यानुसार सात हत्तींनी धक्का मारूनसुध्दा ती शिळा जागची हलली नाही. Balancing चा हा एक नैसर्गिक चमत्कार आहे. या शिळेला म्हणतात ’Krishnas Butter Ball’ !!!!IMG_0900 

तिथेच थोडं पुढे गेलं की दोन शिळा एकमेकांना टेकून तयार झालेली नैसर्गिक गुंफा दिसते. ही होती फॅक्टरी जिथे पल्लवाने कोरीव काम करण्यासाठी हत्यारे तयार केली. मोठमोठाल्या शिळा फोडण्यासाठी डायनॅमो वगैरे न वापरता एक वेगळेच तत्त्व येथे वापरले होते. cropIMG_0909जो दगड फोडायचा आहे, त्यावर छोटे छोटे छेद करून घ्यायचे, त्यामध्ये एका विशिष्ट प्रकारच्या लाकडाचे तुकडे टाकून त्यामध्ये गरम पाणी ओतायचे, त्या गरम पाण्याने लाकूड प्रसरण पावते आणि १५-२० दिवसांत तो दगड फुटतो. हे ऎकतानाच अंगावर काटा आला. आपले पूर्वज काय अफाट बुध्दीमत्तेचे होते नं!! हातात फारशी काही साधने नसताना १४०० वर्षापूर्वी केवळ आम जनतेला माहिती व्हावे म्हणून एवढे कष्ट करून पल्लवांनी या शिल्पकृती तयार केल्या आहेत. मनातून खूप भरून आलं होतं. याच ठिकाणी गंगा नदी आणि शिवशंकराचाही देखावा तयार केला आहे. इंदिरा गांधी महाबलीपुरम्‌ला बर्‍याचदा यायच्या म्हणे!! येथे बकरी आणि हरीण बसलेले एक शिल्प आहे, जे आपल्या पूर्वीच्या १० रु.च्या नोटेवर छापले 

IMG_0897होते, याठिकाणाची स्मृती म्हणून !!. 

याच भागात वेगवेगळया छोट्या गुंफा आहेत, त्यामध्ये विष्णूचे जे दहा अवतार आहेत, त्यापैकी वराह अवतार आणि वामनावतार यामधील काही शिल्पे कोरलेली आहेत. कृष्णकुंज बघून बाहेर पडताना आपण एका भारलेल्या अवस्थेतच असतो. 

सुपारीशिवाय – सुपारी

खूप दिवसांनी ब्लॉगवर आलेय्‌. नाशिक सोडून सध्या आम्ही चेन्नईला स्थायिक झालो आहोत. नवीन ठिकाण, भाषेपासून खाण्यापिण्यापर्यंत सगळं काही नवीन. आम्ही जून महिन्यात चेन्नईला आलो. श्रृतीची शाळा, घर लावणे , नवा परिसर माहित करून घेणे, नव्या ओळखी , नव्या मैत्रिणी , तामिळ भाषेची जुजबी ओळख करून घेणे या सगळ्यात नवी पोस्ट लिहायला जमलेच नाही. अर्थात इकडे आल्यावर भटकंती बरीच झाली आहे. वेल्लोरचे गोल्डन टेंपल , कांचीपुरम्‌ , पॉंडीचेरी, महाबलीपुरम्‌ अशी जवळपासची बरीच ठीकाणं बघून झालीयेत्‌ . त्याबद्द्लची सविस्तर पोस्ट नंतर टाकेन.

आज चक्क मी एक रेसिपी सांगणार आहे. ‘सुपारीशिवाय सुपारी’ म्हणजे सुपारी न वापरता केवळ बडीशेप वगैरे वापरून एक वेगळ्या प्रकारची सुपारी किंवा मुखवास!!! ही मूळ रेसिपी माझ्या आतेसासूबाईंची – कुमुदआत्यांची आहे. त्या यामध्ये कच्ची सुपारी फोडून थोड्या तुपात परतून वापरायच्या. लहान असताना श्रृती ही सुपारी आवडीने खायची. म्हणून मी मूळच्या रेसिपीमधला ‘कच्ची सुपारी’ हा भाग वगळून थोडी रेसिपी modify केली आहे. करायला अगदी सोपी आहे आणि पटकन्‌ होणारी आहे. तेव्हा करून बघा आणि कळवा कशी झालीय्‌ ते !!!

घटक पदार्थ – 

२५० ग्रॅम बडिशेप (जाड किंवा देशी मिळाली तर उत्तम)
५० ग्रॅम सुके खोबरे किसून
५० ग्रॅम ओवा (थोडा जास्त घेतला तरी चालेल)
१०० ग्रॅम जेष्ठ्मध पावडर
४ लवंगा
४ वेलदोडे (सालासकट आख्खे वेलदोडे घ्यावेत)
चमनबहार २ टी स्पून (‘चमनबहार’लाच रोझ पावडर म्हणतात.)
मीठ १ चिमूट

कृती-

१. प्रथम कढई गरम करून त्यात किसलेले खोबरे थोडे कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यावे. फार लाल करू नये किंवा जास्त भाजू नये.
२. ते खोबरे ताटात काढून त्याच कढईत बडिशेप भाजून घ्यावी. ती ही फार भाजू नये. फार कुरकुरीत करू नये.
३. त्यातच आता ओवा, लवंगा आणि वेलदोडे घालून थोडे परतावे.
४. आता गॅस बंद करून त्याच कढईत पहिल्यांदा गरम केलेले खोबरे घालून व्यवस्थित मिसळून घ्यावे.
५. हे सर्व मिश्रण पूर्ण गार होऊ द्यावे.
६. हे गार झालेले मिश्रण मिक्सरला फिरवून घ्यावे. थोडेसे भरडच ठेवावे, फार बारिक करू नये.
७. एका मोठ्या भांड्यात हे मिश्रण काढून त्यात मीठ, चमनबहार आणि निम्मी जेष्ठ्मध पावडर घालून चांगले मिसळून घ्यावे.
८. जर गोडीला कमी वाटले तर थोडी थोडी जेष्ठ्मध पावडर घालून चांगले मिसळून घ्यावे.
९. सुपारीशिवाय सुपारी तयार आहे. ही हवाबंद डब्यात साठवावी.

टीप – चमनबहार हे सुवासासाठी वापरतात आणि त्याला साधारण पानमसाल्यासारखी चव असते. आपल्या आवडीप्रमाणे याचे प्रमाण वाढवले तरी चालते. पण खूप जास्त झाले तर थोडी कडवट चव लागू शकते.

 

ई-मेल

थांबा , ई-मेल नावावरून मी तुम्हाला बोगस ई-मेल कशा येतात, या फॉरवर्डेड ई-मेल्सनी कसा वैताग आणलाय किंवा दिलेल्या सेरीजच्या पुढचा नंबर ओळखून अ‍ॅटॅच केलेल्या फाईलमध्ये तुमचे नांव टाका अशा प्रकारच्या कथा सांगून बोअर करणार नाहीय्‌. माझा एक वेगळाच प्रश्न आहे, “I have sent you an e-mail” या वाक्याचं मराठीत भाषांतर तुम्ही काय करता? मी तुला एक मेल पाठवलीय्‌ , मी तुला एक मेल पाठवलाय्‌ की मी तुला एक मेल पाठवलंय्‌ ? आता कसं आहे की कुणी आजकाल ई-मेल असं म्हणत नाही तर फक्त मेल असं म्हणतात कारण मेल म्हणजेच ई-मेल हे आपण गृहीत धरलंय्‌. अगदीच बाय पोस्ट काही पाठवायचं असेल तर आपण कुरिअर करतो नाही कां? असो.
तर माझा प्रश्न असा आहे की ती मेल, तो मेल की ते मेल? झालं कन्फ्यूजन ? पूर्वी माझं याबाबतीत नेहमी कन्फ्यूजन व्हायचं. आम्ही इंजिनियरिंगला असताना मुळात इंटरनेट ही नवीन गोष्ट होती आणि त्यात ई-मेल म्हणजे तर खूपच नवीन. त्यामुळे त्याकाळात ( अगदी सोपं सांगायचं तर १२/१५ वर्षापूर्वी ) ई-मेल अकाउंट असणे ही अभिमानाची बाब होती. (आम्ही तेव्हा ई-मेल अकाउंट म्हणायचो , मेल आय्‌डी नाही) “अय्या, तुझं ई-मेल अकाउंट नाहीय्‌? अगं मग काढ नां, मी तुला ई-मेल पाठवते.” असं कॉलेजात रोज भेटणार्‍या मैत्रिणीला सांगायचो. अर्थात तेव्हा ई-मेल पाठवणं ही फार सोपी गोष्ट नव्हती. कारण तेव्हा घरोघरी इंटरनेट नव्हतं. कॉलेजात फक्त काही वेळापुरतेच इंटरनेट वापरायला परवानगी असायची. मग नेट सर्फिंग करायचे किंवा ई-मेल पाठवायचा ( तेव्हा मी ते पत्र सारखं तो मेल असं म्हणायची, मेल हा ती किंवा ते कसं असेल, तो ‘तो’ च असणार असा मे बी यामागे विचार असेल) तर सायबर कॅफेत जाऊन ताशी ४० रू. द्यावे लागायचे. आजकाल कसे गल्लोगल्ली सायबर कॅफे दिसतात तसे तेव्हा नसायचे. हळूहळू ई-मेल असं म्हणणं मागासलेपणाचं वाटायला लागला त्यापेक्षा नुसतं मेल असं म्हणायला आवडायला लागलं. जर कुणी चुकून ई-मेल असं म्हंट्लं तर कळायचं की ये अभी बच्चा है. तर आम्ही कोल्हापुरात तो मेल असं म्हणायचो. त्यावेळी पुण्यात राहणारी माझी मैत्रिण मला म्हणाली, “वैशाली , मी तुला एक मेल पाठवली होती, मिळाली कां?” बाकी कशाकडे माझं लक्ष न जाता, मैत्रिण ती मेल म्हणाली याकडे जास्त लक्ष गेलं आणि ती ‘पुण्यातली’ मैत्रिण होती. नंतर माझा चाळाच होऊन बसला की बोलताना बाकी सगळे काय म्हणतायत्‌ ती मेल, तो मेल की ते मेल? त्यावेळेस जास्तीत जास्त रेटींग ती मेल ला मिळालं होतं.
त्यावेळेस बहुतेकांची ई-मेल अकाउंटस्‌ ही हॉट्मेल नाहीतर याहूवर असायची. कोणत्या वेबसाईटवर किती जास्त स्पेस मिळते हे पाहून तिथे इ-मेल अकाउंट उघडले जायचे. इंटरनेट सिक्युरिटी किंवा इतर फॅसिलीटीज्‌ जसं की चॅटींग, व्हिडिओ कॉलिंग वगैरे गोष्टी तर कोसों दूर होत्या. माझें सर्वात पहिलं अकाउंट हे युएस्‌ए.नेट वर होते कारण जेव्हा त्यावर ७ जीबी स्पेस मिळत होती, तेव्हा याहू, हॉटमेल वगैरे ५० ते ७० एम्‌बी स्पेस देत होते. आता ते अकाउंट बंद केलंय्‌. आजकाल ई-मेल अकाउंट ओपन करताना स्पेस हा क्रायटेरियाच लागू होत नाही कारण बहुतेक वेबसाईटस्‌वर अमर्यादीत जागा उपलब्ध करून दिलेली असते. सध्या मला तर वाटतंय्‌ की जीमेल आय्‌डी नाही अशी व्यक्ती (अर्थात नेट वापरणार्‍यांपैकी) शोधावी लागेल.
संवाद साधण्याचे साधन म्हणून राजेमहाराजेंच्या काळात कबुतरांना प्रशिक्षण देऊन संदेशाची देवाणघेवाण व्हायची. ब्रिटीशांच्या काळात संदेशाची देवाणघेवाण जलद होण्यासाठी पोस्ट ऑफिस ही संकल्पना आली. मला आठवतंय्‌ माझे आजोबा तर सकाळचा काही वेळ हा पत्र लिहण्यासाठी राखून ठेवायचे. या पोस्ट ऑफिसची जागा कुरियरने कधी घेतली हे कळालेच नाही. १०/१५ वर्षापूर्वी जर काही वस्तू सुरक्षितरित्या आणि जलद पाठवायची असेल तरच कुरियर केले जायचे. नंतर हळूहळू पत्रं, लग्नाची निमंत्रणं ही सुध्दा कुरियर केली जाऊ लागली. इंटरनेट्चा जसा प्रसार झाला आणि लोकांना याची उपयुक्तता पटली तेव्हा तर संदेशाची देवाणघेवाण अतिजलद होण्यासाठी ई-मेल , चॅटींग या गोष्टी वापरल्या जाऊ लागल्या. आजकालच्या लहान मुलांना पोस्ट ऑफिस काय असतं हे माहितच नाहिय्‌. शाळेत EVEच्या फिल्ड व्हिजीट मध्ये त्यांना पोस्ट ऑफिस दाखवले जाते. आता तर सोशल नेटवर्किंग साईट्स्‌ मुळे लोकांना ई-मेल वापरही कमी झालाय्‌. मध्यंतरी मी एका पेपरला वाचलं होतं की जसं पोस्ट हे कालबाह्य झालं आहे तसं येत्या काही वर्षात ई-मेल करणं हे ही कालबाह्य होईल. ऑफिशियल काही कामासाठी मेल वापरले जातील पण व्यक्तिगत संपर्काचे माध्यम म्हणून ई-मेलचा वापर खूपच कमी होईल. याची प्रचिती आत्ताच येऊ लागली आहे. ८/१० वर्षापूर्वी नवरा कामानिमित्त जेव्हा परदेशात जायचा तेव्हा संपर्कात राहण्याचे सर्वात स्वस्त माध्यम ई-मेल हेच होते. नंतर स्काईप आलं आणि सगळं चित्रच बदलून गेलं. नेटवर्किंग साईट्स्‌, ब्लॉग्ज, व्हिडीओ चॅटिंग यासारख्या सुविधा असताना ई-मेल चा वापर केवळ आलेल्या ई-मेल फॉरवर्ड करण्यासाठीच होतो. या सगळ्या बदलाचे आपण साक्षीदार आहोत हे काय कमी आहे?