देवा हो देवा….

 
काल आमच्या ऑफिसच्या बाजूला साईबाबांचा प्रसाद म्हणून तांदळाची खिचडी (ज्याला भंडारा म्हणतात) वाटप चालू होते. येणारे जाणारे बहुतेक सर्वजण थांबून साईबाबांच्या प्रतिमेला नमस्कार करून प्रसाद घेत होते. माझे लेक्चर संपवून मी बाहेर पडले. खाली सर्व विद्यार्थी रांग लावून प्रसाद घेत होते. मी स्कूटी काढायला आल्यावर माझे सर्व विद्यार्थी आता मी काय करते याकडे लक्ष नाही असं दाखवत, बघायला लागले. डोळ्याच्या कोपर्‍यातून म्हणतात नां तसं.मी साईबाबांना नमस्कार केला पण प्रसाद न घेताच निघून गेले.  

आज सकाळी लेक्चर संपल्यावर एका विद्यार्थ्याने विचारलेच,” मॅडम, तुम्ही बाबांचा प्रसाद घेतला नाही?”. मी फक्त हसले.आणि पुढ्च्या लेक्चरला गेले. पण यावरूनच माझ्या मनात विचारमालिका चालू झाली.मी जाणीवपूर्वक प्रसाद घेतला नाही.तिथे एका मोठ्या पातेल्यात खिचडी ठेवली होती.त्यातून एका ताटाने ती खिचडी एकजण काढायचा, दुसरा हाताने बचकभर खिचडी प्लॅस्टीकच्या द्रोणातून आलेल्यांना द्यायचा.एका मोठ्या टेबलवर खिचडीचे ताट , प्लॅस्टीकच्या द्रोण, प्यायला पाणी वगैरे ठेवले होते. आणि त्या टेबलच्या शेजारीच बहुतेकांनी खिचडी खाऊन टाकलेल्या द्रोणांचा पसारा पडला होता. एकूणच ते सगळं पाहून मला प्रसाद घ्यावासा वाटला नाही. मग मी नास्तिक आहे कां?

मी चतुर्थीचा उपवास करते.मागच्या महिन्यात आम्ही हैद्राबादला गेलो होतो तेव्हा प्रवासात असताना चतुर्थी आली होती. (२ दिवस आधीपासून माहीत होते की अमुक दिवशी चतुर्थी आहे आणि आपण प्रवासात असणार आहोत.) मी तेव्हा उपवास केला नाही. (यावेळी उपवास नको करायला असं कदाचित मनात आधीच ठरवलं होतं कां?) प्रवासात आधीच खाण्याचे हाल असतात, त्यात उपवास करून तब्येत बिघडेल असा विचार मनात होता. पण हेच जर घरी असताना चतुर्थी आहे हे लक्षात नसताना सकाळी चहाबिस्कीट खाल्ले किंवा दिवसभर उपवास केला आणि संध्याकाळी भेळ किंवा असंच दुसरं काही खाण्यात आलं तर मात्र चुटपुट लागून रहाते. “अरे आज चतुर्थी आहे हे कसं लक्षात राहीलं नाही?”. परिस्थिती वेगवेगळी असली तरी दोन्हींचा End Result सारखाच आहे उपवास मोडणं.!! मग एका प्रसंगात मनाला लागत नाही आणि दुसर्‍या प्रसंगात मनाला टोचणी लागते की माझा उपवास मोडला. असं कां होतं? आपण आपल्या सोईप्रमाणे वागत असतो कां? वरच्या खिचडीच्या प्रसंगामध्ये मनात कुठेतरी हायजीनचा विचार होता पण हाच विचार हॉटेलमध्ये किंवा स्टॉलवरचा चमचमीत वडापाव खाताना येत नाही. कां?

मी काही फार देवभोळी ,अस्तिक वगैरे नाही पण कठीण परिस्थिती आधार वाटतो तो देवाचाच. मनातल्या मनात गणपतीचा धावा चालू होतो. देवाचं अस्तित्व माझ्या मनात सतत असतं. त्यामुळंच प्रत्येक गोष्ट ही सद्स‌द्‌विवेकबुद्धीला अनुसरून केली जाते. मी काही चुकीचं वागले तर देवाला काय वाटेल, देव काय म्हणेल असा विचार असतो. देव रागावेल, शाप देईल असा नसतो. देवाला मी माझा मित्र, पालक मानते. एक प्रेमळ वडीलधारी व्यक्ती जिचा आदरयुक्त दरारा वाटतो पण भीती नाही वाटत. असं वाटतं की देव मला समजून घेईल पण मी त्याला गृहीत धरत नाही. घरी देवाची पूजा रोज आई करतात, पण त्या कधी बाहेरगावी गेल्या तर माझ्याकडून पूजा रोज होतेच असं नाही. एकूणच मला कर्मकांडात अडकायला आवडत नाही. पूजाअर्चा, धूप, फुलं, अक्षता या गोष्टींनी देव प्रसन्न होतो की नाही ते माहीत नाही पण त्यामुळे माझ्या मनाला प्रसन्नता मिळते. मग ती प्रसन्नता मिळण्यासाठी मी पूजा करते. अशा बाह्य गोष्टींनी प्रसन्नता तेव्हाच मिळवावी लागते, जेव्हा मन अशांत असते. म्हणजे काय तर मी देव मानते पण तो मूर्तीतच आहे असं न मानता चांगुलपणा, माणुसकी आणि एकूणच विवेकी वागणे यात त्याचं अस्तित्व पाहते 

ता.क – ही पोस्ट मी शनिवारीच टाकणार होते, पण नेट खूप स्लो होते, ‘नवीन नोंद’ चे पेज लोड व्हायलाच १० मि. लागली. शेवटी विचार केला की जाऊ दे, देवाच्याच मनात नाहीय. सोमवारी टाकू पोस्ट. 
 
ता.ता.क – नाही नाही… ही पोस्ट शनिवारीच टाकावी असं देवाच्या मनात आहे. 

साधी राहणी

एका forwarded mail मधून आलेली एक भन्नाट मिश्कीली, मूळ इंग्लीशमध्ये असलेली ‘Simple living avoids complications’ ‘साधी राहणी तणावरहीत जीवनअशी अनुवादीत करून ती इथे देत आहे. (तंबी दुराईंच्या दोन फुल , एक हाफ स्टाईलमध्ये ) 
 
 दोन फुल 
 ***
 मुकेश अंबानी त्यांच्या २७ मजली घरात(!) राहत असतात. एके दिवशी ऑफिसला जाण्यासाठी स्वतःच मर्सीडीज ड्राईव्हकरत जायचे असं ठरवून १७ व्या मजल्यावर उठतात, १९ व्या मजल्यावर बाथघेऊन २१ व्या मजल्यावर ब्रेकफास्टसाठी जातात. नंतर ऑफिसला जायची तयारी करण्यासाठी १५ व्या मजल्यावर जातात. मुलांचा निरोप २२ व्या मजल्यावर आणि पत्‍नी नीताला १६ व्या मजल्यावर बायकरून मर्सीडीज घेण्यासाठी ३ र्‍या मजल्यावर जातात. तिथे गेल्यावर त्यांच्या लक्षात येते की गाडीच्या किल्ल्या त्यांच्या खिशात नाहीत. मग त्या राहील्या कुठे? १७ व्या,१९ व्या,१५ व्या, २१ व्या, २२व्या, की १६ व्या मजल्यावर? सगळे नोकर किल्लीची शोधाशोध चालू करतात. पण किल्ली काही मिळत नाही. शेवटी 5 व्या मजल्यावरची शोफर ड्रीव्हन’ BMW घेऊन ते ऑफिसला जातात.  
 
***
 चार दिवसांनी नीताला ती किल्ली मिळते. कुठे? तर मुकेशरावांच्या इस्त्रीला द्यायच्या पॅंट्च्या खिशात. ती तिथे कशी? याची चौकशी केल्यावर कळते, की घरात आलेल्या एका तात्पुरत्या नोकराने पॅंट्चे खिसे चेक न करताच ती पॅंट् धुतलेली असते. केवळ नीताच्या जागरूकपणामुळे, इस्त्रीला द्यायचे कपडे स्वतः चेक करण्याच्या सवयीमुळे ती किल्ली मिळते.
 
 
एक हाफ-
***
या कहाणीत अजून एक छोटा किस्सा बाकी आहे. किल्ली ज्या दिवशी हरवते, त्याच्या दुसरे दिवशी नीता मुकेशला विचारते, “काल रात्री घरी यायला तुला इतका उशीर कां झाला?रात्री ३ वाजता झालेल्या हेलिकॉप्टरच्या आवाजाने माझी जी झोपमोड झाली, त्यानंतर मला लवकर झोप आली नाही.” मुकेश म्हणतात, “अगं ते हेलिकॉप्टर माझं नव्हतं तर मर्सीडीजची लोकं डुप्लीकेट किल्ली देण्यासाठी आली होती“.

हुश्श!! संपला किस्सा. तर या सगळ्याचा मतितार्थ काय तर “Its better to have 1 BHK, 2 BHK or 3 BHK flats.”

       “Live Simple and Avoid Complications.” !!!!!