सुपारीशिवाय – सुपारी

खूप दिवसांनी ब्लॉगवर आलेय्‌. नाशिक सोडून सध्या आम्ही चेन्नईला स्थायिक झालो आहोत. नवीन ठिकाण, भाषेपासून खाण्यापिण्यापर्यंत सगळं काही नवीन. आम्ही जून महिन्यात चेन्नईला आलो. श्रृतीची शाळा, घर लावणे , नवा परिसर माहित करून घेणे, नव्या ओळखी , नव्या मैत्रिणी , तामिळ भाषेची जुजबी ओळख करून घेणे या सगळ्यात नवी पोस्ट लिहायला जमलेच नाही. अर्थात इकडे आल्यावर भटकंती बरीच झाली आहे. वेल्लोरचे गोल्डन टेंपल , कांचीपुरम्‌ , पॉंडीचेरी, महाबलीपुरम्‌ अशी जवळपासची बरीच ठीकाणं बघून झालीयेत्‌ . त्याबद्द्लची सविस्तर पोस्ट नंतर टाकेन.

आज चक्क मी एक रेसिपी सांगणार आहे. ‘सुपारीशिवाय सुपारी’ म्हणजे सुपारी न वापरता केवळ बडीशेप वगैरे वापरून एक वेगळ्या प्रकारची सुपारी किंवा मुखवास!!! ही मूळ रेसिपी माझ्या आतेसासूबाईंची – कुमुदआत्यांची आहे. त्या यामध्ये कच्ची सुपारी फोडून थोड्या तुपात परतून वापरायच्या. लहान असताना श्रृती ही सुपारी आवडीने खायची. म्हणून मी मूळच्या रेसिपीमधला ‘कच्ची सुपारी’ हा भाग वगळून थोडी रेसिपी modify केली आहे. करायला अगदी सोपी आहे आणि पटकन्‌ होणारी आहे. तेव्हा करून बघा आणि कळवा कशी झालीय्‌ ते !!!

घटक पदार्थ – 

२५० ग्रॅम बडिशेप (जाड किंवा देशी मिळाली तर उत्तम)
५० ग्रॅम सुके खोबरे किसून
५० ग्रॅम ओवा (थोडा जास्त घेतला तरी चालेल)
१०० ग्रॅम जेष्ठ्मध पावडर
४ लवंगा
४ वेलदोडे (सालासकट आख्खे वेलदोडे घ्यावेत)
चमनबहार २ टी स्पून (‘चमनबहार’लाच रोझ पावडर म्हणतात.)
मीठ १ चिमूट

कृती-

१. प्रथम कढई गरम करून त्यात किसलेले खोबरे थोडे कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यावे. फार लाल करू नये किंवा जास्त भाजू नये.
२. ते खोबरे ताटात काढून त्याच कढईत बडिशेप भाजून घ्यावी. ती ही फार भाजू नये. फार कुरकुरीत करू नये.
३. त्यातच आता ओवा, लवंगा आणि वेलदोडे घालून थोडे परतावे.
४. आता गॅस बंद करून त्याच कढईत पहिल्यांदा गरम केलेले खोबरे घालून व्यवस्थित मिसळून घ्यावे.
५. हे सर्व मिश्रण पूर्ण गार होऊ द्यावे.
६. हे गार झालेले मिश्रण मिक्सरला फिरवून घ्यावे. थोडेसे भरडच ठेवावे, फार बारिक करू नये.
७. एका मोठ्या भांड्यात हे मिश्रण काढून त्यात मीठ, चमनबहार आणि निम्मी जेष्ठ्मध पावडर घालून चांगले मिसळून घ्यावे.
८. जर गोडीला कमी वाटले तर थोडी थोडी जेष्ठ्मध पावडर घालून चांगले मिसळून घ्यावे.
९. सुपारीशिवाय सुपारी तयार आहे. ही हवाबंद डब्यात साठवावी.

टीप – चमनबहार हे सुवासासाठी वापरतात आणि त्याला साधारण पानमसाल्यासारखी चव असते. आपल्या आवडीप्रमाणे याचे प्रमाण वाढवले तरी चालते. पण खूप जास्त झाले तर थोडी कडवट चव लागू शकते.