मन सुद्द तुजं……..

 
लहान मुले आपल्याला कळत नकळत बरेच काही शिकवून जात असतात. त्याचाच अनुभव काल आला.

श्रृतीनं काल तिचा डबा शाळेत संपवला नव्हता, परवा दिवशी पण थोडा डबा शिल्लक होता. म्हणून मी तिला म्हंटले “काय ग श्रृती, टिफीन फास्ट फास्ट फिनिश करायचा नाही कां ? तुझा टिफीन शिल्लक कसा काय राहतो?” यावर तिनं जे काही उत्तर दिलं ते तिच्याच भाषेत सांगते. “अगं आई, ती सार्या आहे नां, माझी फ्रेंड, तिला शू आली होती टिफीन रिसेस मध्ये, मग मला तिला टॉयलेट्पर्यंत सोडायला जावं लागलं . मग मी परत आल्यावर फास्ट फास्ट टिफीन खाल्ला पण थोडा राहिला.” मी पूर्णपणे गोंधळात पडले. मनात विचार केला की ही सार्या एकटी कां नाही टॉयलेट्ला गेली? मी तसं श्रृतीला विचारलं. तर ती म्हणाली, “अगं आई, सार्या नां छोटी आहे.” “म्हणजे? ती तुझ्याच क्लासमध्ये आहे नां?”. “हो गं, पण तिचे पाय छोटे आहेत, मग तिला स्टेप्सवर चढताना दोन्हीकडून धरावं लागतं. मग मी आणि रिद्धी तिला घेऊन टॉयलेट्ला गेलो”. मला लक्षात आलं की, तिच्या मैत्रिणीच्या पायात काही दोष असणार आहे. तिला जिना चढता येत नाही. या सगळ्याजणी टिफीन खायला ग्राउंडवर जातात. सार्याला सोडण्यासाठी श्रृती आणि तिची मैत्रिण रिद्धी पहिल्या मजल्यावरच्या ज्युनिअरसाठीच्या टॉयलेट्पर्यंत गेल्या होत्या. (तिथे मावशी असतात मदत करायला.) मला श्रृतीचं इतकं कौतुक वाटलं !!!. आपला टिफीन तसाच अर्धवट सोडून ती मैत्रिणीला मदत करायला गेली होती. मग मी तिला मुद्दाम विचारले, “तुला टीचरनी तिची मदत करायला सांगितली होती कां?”, “नाही गं, मला तिची हेल्प करायला आवडतं, ती माझी फ्रेंड आहे नां!!”. मला खूप भरून आलं. मी तिला फक्त एवढंच म्हणू शकले, “व्हेरी गुड, माय बच्चा. अशीच सगळयांना मदत करत जा”.

जराही कुरकुर, तक्रार न करता, कोणताही ‘मी हे केलं’ असा गर्व न ठेवता, कुणीही न सांगता श्रृतीनं आपणहून मदत केली. मला खरंच तिचा खूप खूप अभिमान वाटला.

रिक्षा/व्हॅन वाले काका

 

माझी शाळा घरापासून बर्‍यापैकी जवळ होती. त्यामुळे आम्ही सर्व मैत्रिणी मिळून चालत शाळेला जायचो. तेव्हाही रिक्षामधून शाळेला येणार्‍यांबद्द्ल कुतुहल असायचे. स्कूल बस हा प्रकार काही निवडक इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून उपलब्ध असायचा. 

आता शाळा घरापासून लांब किंवा जवळ असली तरी बहुतेक सर्व मुले रिक्षा, व्हॅन किंवा स्कूलबसमधून शाळेला जात असतात. या मुलांचा एक ग्रुप तयार झालेला असतो. वेळेअभावी श्रृतीला मी रोज शाळेत नेऊआणू शकत नाही म्हणून या वर्षी व्हॅन लावली आहे. व्हॅन / रिक्षावाल्या काकांबरोबर या मुलांचं एक वेगळंच नातं तयार झालेलं असतं. आज आईनं डब्यात काय दिलंय इथपासून टीचर, स्कूलमधले फ्रेंडस्‌ काय म्हणाले इथपर्यंत या काकांबरोबर गप्पा होत असतात. प्रत्येक वर्षी स्कूलच्या शेवटच्या दिवशी या काकांकडून त्यांच्या रिक्षा / व्हॅन मधल्या सर्व मुलांना छोटीशी गिफ्ट व मुलांचा आवडता खाऊ (कुरकुरे, कॅडबरी) वगैरे असतो. तिचे व्हॅनकाका रोज सकाळी गणपतिस्त्रोत्र, हनुमानस्त्रोत्र, रामरक्षा अशा कॅसेटस्‌ लावत असतात. मी त्यांना म्हंट्लं, “काका, तुम्ही व्हॅनमध्ये स्त्रोत्रं , श्लोक वगैरे लावता ते खूप छान वाटतं. त्यानिमित्ताने मुलांची सकाळ प्रसन्न होते.” ते म्हणाले, “हो तर. ऎकून ऎकून मुलांचे श्लोक पाठ होतात. मी गाडीत FM वगैरे कधीच लावत नाही.”  

एके दिवशी श्रृतीनं मला ऑर्डर सोडली, “आई, मला एक व्हाईट पेपर अ‍ॅन्ड ब्लू स्केचपेन दे. व्हॅनमधली एक ताई मला ग्रिटींग करायला शिकवणार आहे.”(रच्याक – या वयाच्या मुलांची भाषा हा एक वेगळा विषय आहे. एका वाक्यात मराठी, हिंदी, इंग्रजी अशी सगळी सरमिसळ असते).वेगवेगळ्या वयाच्या मुलांबरोबर कसं जुळवून रहायचं हे मुलं इथं शिकतात. मला तरी असं वाटतं की शाळेत जाण्याआगोदरची मुलांची मानसिक तयारी ही या व्हॅन किंवा रिक्षात होत असते. म्हणजे घरातून आईला सोडायला नाराज असणारं मुल, व्हॅन किंवा रिक्षात आपल्या मित्रांच्या साथीत खुलतं आणि आनंदात हसत शाळेत जातं. 
 
काही खुलासे –
१.    रच्याक हा By The Way चा मराठी अनुवाद आहे.
 २. इथे स्कूलबस किंवा त्याच्याशी निगडीत इतर गोष्टींचा उल्लेख नाही, कारण त्याचा अनुभव नाही. 

 

 

एक गोष्ट ….काही comments…..

 

माझ्या मुलीला – श्रृतीला (वय वर्षे ६) रात्री झोपवताना एक गोष्ट सांगत होते. खूप नाजूक , सात गाद्यांच्या पलंगावर झोपणार्‍या राजकन्येची ! आपल्यापैकी खूप जणांनी ही गोष्ट ऎकली असेल. तर या राजकन्येच्या पाठीवर वळ उठतो तो कशामुळे तर सात गाद्यांच्याखाली असणार्‍या एका केसामुळे…..इतकी ती नाजूक!!! ही गोष्ट श्रृतीला सांगितल्‍यानंतर अपेक्षित comments मिळाल्या नाहीत ….. त्‍यावरूनच या पोस्टचा विषय सुचला…..  या गोष्टीवर कोणत्‍या वयोगटातल्‍या व्‍यक्‍तींच्या, काय comments असतील?(comments = प्रतिक्रीया(???) Actually मला वाटते की प्रतिक्रीया म्हणजे reaction …… comments साठी योग्‍य मराठी प्रतिशब्द शोधायला हवा…….असो. अभिप्राय हा शब्द योग्य होईल कां?)

माझी पिढी – वय ६ ते ७ – हो? खर्रर्रर्रर्रच? (डोळे झाकून  विश्वास…)

आताची पिढी – वय ६ ते ७ – ती राजकन्या सात गाद्यांच्यावर कां झोपायची? ती एवढ्या उंचावर कशी चढायची ? (जिज्ञासू….स्वत:च्या बुद्धिला पटेल तेच करणार) वय १६ ते १८ – वॉव….. So cute…… (स्वप्नाळू वय….)

वय २३ ते २७ – हूं………अस्सं????? (या लोकांना अशा फॅण्टसीज्‌ कडे लक्ष द्यायला वेळ नसतो)

वय ३६ ते ४० – अग पोरी , वडीलांकडे चालतात असे नखरे…पण नवर्‍याकडे नाही चालायचे. आणि इतकं नाजूक राहून कसं चालेल, या वयातच हे हाल… तर पुढे कसं होणार? (काळजी….लगेच भावनावश होणे…)

अशीच एक दुसरी गोष्ट … ‘बाजीराव – मस्तानी’तल्या मस्तानीची.. मस्तानी इतकी गोरी व नाजूक कि तिने विड्याचे पान खाल्ले तर त्याचा रस तिच्या गळ्यातून उतरतानां दिसायचा….

माझी पिढी – वय ६ ते ७ – हो? खर्रर्रर्रर्रच?

आताची पिढी – वय ६ ते ७ – ई…. ते किती dirty दिसत असेल….(Very Practicle) वय १६ ते १८ –  Wowwwww!!!!….. So cute…… काय करत असेल ती अशा गोरेपणासाठी?  (बाह्यसौंदर्याविषयी वाढलेला सजगपणा)

वय २३ ते २७ – हूं………अस्सं?????

वय ३६ ते ४० – मुलांवर ओरडून आमच्याही घशाच्या शिरा ताणतात… त्या बघायला असतो कां कुणाला वेळ ? करतांयत्‌  मारे मस्तानीचं कौतुक…..

अर्थात्‌ ‘स्त्रीवर्ग’ कशाप्रकारे प्रतिक्रीया देईल त्याचा विचार करून वरील प्रतिक्रीया लिहल्या आहेत. पुरूषवर्ग अशा फॅण्टसीज्‌वर  comments करतो कां? माहीत नाही , अंदाजसुद्धा करता येत नाही…. जाणकारांनी अवश्य मार्गदर्शन करावे…..

(मिळालेला धडा – आताच्या मुलांना सांगायच्या गोष्टींची निवड खूप काळजीपूर्वक करावी लागते….)