साधी राहणी

एका forwarded mail मधून आलेली एक भन्नाट मिश्कीली, मूळ इंग्लीशमध्ये असलेली ‘Simple living avoids complications’ ‘साधी राहणी तणावरहीत जीवनअशी अनुवादीत करून ती इथे देत आहे. (तंबी दुराईंच्या दोन फुल , एक हाफ स्टाईलमध्ये ) 
 
 दोन फुल 
 ***
 मुकेश अंबानी त्यांच्या २७ मजली घरात(!) राहत असतात. एके दिवशी ऑफिसला जाण्यासाठी स्वतःच मर्सीडीज ड्राईव्हकरत जायचे असं ठरवून १७ व्या मजल्यावर उठतात, १९ व्या मजल्यावर बाथघेऊन २१ व्या मजल्यावर ब्रेकफास्टसाठी जातात. नंतर ऑफिसला जायची तयारी करण्यासाठी १५ व्या मजल्यावर जातात. मुलांचा निरोप २२ व्या मजल्यावर आणि पत्‍नी नीताला १६ व्या मजल्यावर बायकरून मर्सीडीज घेण्यासाठी ३ र्‍या मजल्यावर जातात. तिथे गेल्यावर त्यांच्या लक्षात येते की गाडीच्या किल्ल्या त्यांच्या खिशात नाहीत. मग त्या राहील्या कुठे? १७ व्या,१९ व्या,१५ व्या, २१ व्या, २२व्या, की १६ व्या मजल्यावर? सगळे नोकर किल्लीची शोधाशोध चालू करतात. पण किल्ली काही मिळत नाही. शेवटी 5 व्या मजल्यावरची शोफर ड्रीव्हन’ BMW घेऊन ते ऑफिसला जातात.  
 
***
 चार दिवसांनी नीताला ती किल्ली मिळते. कुठे? तर मुकेशरावांच्या इस्त्रीला द्यायच्या पॅंट्च्या खिशात. ती तिथे कशी? याची चौकशी केल्यावर कळते, की घरात आलेल्या एका तात्पुरत्या नोकराने पॅंट्चे खिसे चेक न करताच ती पॅंट् धुतलेली असते. केवळ नीताच्या जागरूकपणामुळे, इस्त्रीला द्यायचे कपडे स्वतः चेक करण्याच्या सवयीमुळे ती किल्ली मिळते.
 
 
एक हाफ-
***
या कहाणीत अजून एक छोटा किस्सा बाकी आहे. किल्ली ज्या दिवशी हरवते, त्याच्या दुसरे दिवशी नीता मुकेशला विचारते, “काल रात्री घरी यायला तुला इतका उशीर कां झाला?रात्री ३ वाजता झालेल्या हेलिकॉप्टरच्या आवाजाने माझी जी झोपमोड झाली, त्यानंतर मला लवकर झोप आली नाही.” मुकेश म्हणतात, “अगं ते हेलिकॉप्टर माझं नव्हतं तर मर्सीडीजची लोकं डुप्लीकेट किल्ली देण्यासाठी आली होती“.

हुश्श!! संपला किस्सा. तर या सगळ्याचा मतितार्थ काय तर “Its better to have 1 BHK, 2 BHK or 3 BHK flats.”

       “Live Simple and Avoid Complications.” !!!!!

है लफंगा बडा…..


कालचा दिवसच वेगळा होता. आम्ही (मी , नवरा व श्रृती) सहज म्हणून बिग बझारमध्ये जातो काय , नवरोबांच्या मनात सहज पिक्चर पाहण्याचा विचार येतो काय आणि आम्ही चक्क ‘लफंगे परिंदे’(स्टारकास्ट दिपिका पडुकोण , नील नितिन मुकेश) या पिक्चरची संध्या. ७.१५ च्या शोची तिकीटे संध्या. ७.३० वाजता मिळवून(!!) तो पिक्चर पाहतो काय….सगळंच वेगळं…… अगदी सर्वच अनपेक्षित…..


कोणताही ‘रिव्ह्यू’ न घेता आम्ही पाहिलेला सिनेमॅक्समधला पहिला पिक्चर
– ज्याला १५ मि. उशिरा जाऊनही तिकीटे विनासायास मिळाली.(रिव्ह्यून घेतल्याचा परिणाम…)
– आतमध्ये प्रवेश केल्यावर ‘या , कुठेही बसा , थिएटर आपलंच आहे ’ असं आमंत्रण मिळाल्यासारखं वाटलं. (कारण आम्ही प्रवेश केला त्यावेळी मोजून ३०-३५ खुर्च्या भरलेल्या होत्या.)(‘रिव्ह्यून घेतल्याचा परिणाम….)पहिली १५ मि. चुकल्यामुळे पिक्चर समजून घेण्यात काहीच अडचण आली नाही.(‘रि’ न घे प…)उलट बहुतेकदा पुढे काय होणार हे आम्ही संगितल्याप्रमाणेच घडत होते. जसं की नीलच्या गाडीने अ‍ॅक्सिडेंट झालेली व्यक्ती दिपिका असणार , अ‍ॅक्सिडेंटमध्ये तिची दृष्टी जाणार , तिला सावरण्यासाठी नीलच मदत करणार पण तिला हे माहित नसणार की तिची दृष्टी जाण्यास तोच कारणीभूत आहे , मग तो तिला स्कॆट डान्समध्ये पार्ट्नर म्हणून उभा राहणार , ते दोघं एका रिअ‍ॅलिटी शोच्या फायनल पर्यंत पोचणार आणि फायनलच्या आदल्या रात्री तिला सत्य परिस्थिती कळणार मग….फैसले की घडी….शेवट गग्गोड्‌ड्‌ड्ड……


काय नाही आहे या पिक्चरमध्ये….
– एक दादा आहे जो सट्टा लावून बॉक्सिंगच्या मॅचेस घेतो ,
– हिरो (नील) ज्याला ‘वन शॉट नन्दू’ म्हणतात कारण तो डोळे बांधून फाइट करतो आणि सुरवातीचा काहीवेळ प्रतिस्पर्ध्याकडून कचकचीत मार खाऊन चेहरा रक्तबंबाळ झाल्यावर एकच शॉट असा मारतो की प्रतिस्पर्धी चारी मुंड्या चीत…. ,
– मुंबैतले टिपिकल चाळीतले वातावरण , दहीहंडी , नवरात्र , गरबा , दिवाळी ….
– हिरॉइन (दिपिका) जी एका मॉलमध्ये काम करत असते, जिला स्केट डान्सची आवड असते आणि खात्री असते की ती एका रिअ‍ॅलिटी शोमध्ये ‘परफॉर्म’ करून ५० लाखाचे पहिले बक्षिस जिंकणार , दृष्टी गेल्यावरही जी हिंमत हरत नाही (दिपिकाचा अभिनय मात्र खरंच चांगला झालाय) ….,
– एक सहृदय पोलिस इनस्पेक्टर जो हिरोच्या लव्हस्टोरीला मदत करण्यासाठी दादाला (तोच तो सट्टा लावून बॉक्सिंगच्या मॅचेस घेतो आणि गॅंगवॉर घडवून आणतो , खुनाची सुपारी देतो) या केसपुरता सोडून देतो व त्याला नंतर कोणत्यातरी केसमध्ये अडकवायचे ठरवतो ,
– प्लस पॉइंटस्‌ जसं की ‘कुछ पाने के लिये येडा बनना जरूरी है’ , नीलचं दिप्सला ती अंध झाल्यानंतर, तिला स्पर्श , गंध ,श्रवण यांच्या जाणीवा कशा वाढ्वायच्या हे शिकवणं ,हा भाग छान झालाय. (२ तासाच्या चित्रपटातील ७ मि. चा भाग!!!)
– दिप्सचं ‘फैसले की घडी’ च्या वेळेस डोकं , मन , भावना शाबूत ठेवून निर्णय घेणं ….
– है लफंगा बडा…. हे FM वर सतत ऎकू येणारं गाणं (जे ऎकून मला वाटलं होतं की ते ’काईटस’ मधलं आहे. पण ते या पिक्चरमध्ये आहे. अर्थात फरक काहीच पडत नाही कारण दोन्ही पिक्चर एकाच ड्ब्यात गेलेत…)


रिकामं सिनेमॅक्स कसं दिसतं , रिव्ह्यू न घेता पिक्चर पाहिल्याचे परिणाम काय असतात , पिक्चरमध्ये पुढे काय होणार आहे हे आपल्याला ओळखता येतं कां , ठोकळा चेहरा म्हणजे काय(पक्षी : नील) , ‘वाट लगाना’ म्हणजे काय , आपले पैसे पुरेपूर वसूल करायचेच असं ठरवून जागं रहाणं म्हणजे काय हे सर्व स्वतःच्या खिशातले पैसे खर्चून समजून घ्यायचे असेल तर जरूर पहा ‘लफंगे परिंदे’…..


ता. क – केलेली भकितं खरी होतायत की नाही हे पाहण्यासाठी मी पूर्ण पिक्चरभर जागी होते . पिक्चर संपल्यावर नवर्‍याला उठवलं उठ बाबा , संपला (एकदाचा) पिक्चर, घरी जाऊया.

बालसंगोपन शास्त्र

 

पूर्वी एकत्र कुटुंबात बरीच मुलं एकत्र वाढायची. त्यामुळे लहान मुलाचे जाणीवपूर्वक ‘संगोपन’ केले नाही तरी चालायचे. माझी आई, सासूबाई म्हणतात तसं, मुलांत मुल वाढायचे. पूर्वी कसं ‘कार्ट्या / कार्टे , तुला एवढं कसं कळत नाही…..?’ ,‘चूप बस, फार अक्कल चालवू नकोस ’ , ‘तूला काय करायच्या आहेत नसत्या चौकशा?’ वगैरे मुलांना म्हणता यायचं, कारण ‘बालसंगोपनशास्त्र , बालमानसशास्त्र’ फार बोकाळलेलं नव्हतं. पण आजकाल असं करता येत नाही. ‘मुलांच्या शंकांचे नीट समाधान करावे…’ , ‘त्यांच्यापासून काही लपवून ठेवू नये..’, ‘मुलांशी मोकळा संवाद असावा..’ इति बा.सं.शा, बा.मा.शा….यामुळेच इतकी गाची होते , कोंडी होते की सांगता सोय नाही…..

श्रुति ४ वर्षाची (वय मुद्दाम सांगितलं आहे. पुढे त्याचा संर्दभ येणार आहे.) असताना , कपाटाचा कप्पा साफ करताना आमच्या लग्नाच्या फोटोचा अल्बम सापडला. फोटोचा अल्बम म्हणजे माझा ‘अशक्त बिंदू’ (मराठीत ‘वीक पॉइन्ट’)!!! मग काय लेकीला बरोबर घेऊन अल्बम पहायला सुरवात केली. त्यानंतर ‘आई , ही तू नां…. हे बाबा नां….? मी : ‘हो, रे, शोना.’ अधून मधून तिच्या बरेच कमॆंटस्‌ चालू होत्या आणि ’तो’ फोटो आला. त्यात माझ्या (तेव्हा होणार्‍या, आता झालेल्या) नवर्‍याच्या जवळ माझा भाचा, श्रेयस बसला होता. श्रुतिनं विचारलं ’आई, हा श्रेयसदादा आहे नां? मग मी कुठेय? मी फोटोत कां नाही?’ …..प्रश्नरूपी ‘बॉम्ब’ पडणे म्हणजे काय हे मला तेव्हा कळाले. गाची होणे , कोंडी होणे म्हणजे काय हे व्यवस्थित समजलं. त्यात बा.सं.शा, बा.मा.शा. डोक्यात पक्कं बसलेलं …. मग मी यथामती तिच्या प्रश्नांची ऊत्तरं द्यायचं ठरवलं…‘अगं, श्रेयसदादा पाहीलंस नां, किती छोटा आहे, मग तू कशी असशील? तू तेव्हा नव्हतीस…”. ‘नव्हते म्हणजे…?,मग मी कुठे होते?’ (तिचा स्वर असा होता की, माझ्या आई-बाबांचं लग्न…आणि मीच फोटोत नाही…. कसं शक्य आहे…?) ((“कार्टे, एकदा संगितलं नां, कळत नाही कां”)इति मी , मनातल्या मनात … कारण बा.सं.शा, बा.मा.शा. मला असं करू देत नव्हते.) शेवटी बा.सं.शा, बा.मा.शा. गंडाळून ठेवलं आणि तिला म्हंटलं, ‘अगं, काल रात्री बाबा आईस्क्रीम घेऊन आलेत. तू झोपली होतीस म्हणून तुझं आईस्क्रीम फ्रीजमध्ये ठेवलंय्‌. तुला हवंय्‌….?’ पोरगी तशी ‘समंजस’ आहे, लगेच तिचा प्रश्न , फोटोचा अल्बम वगैरे विसरून आईस्क्रीम खायला लागली…. मी ‘हुश्श्‌’ करून मोकळा श्वास घेतला.

२ वर्षानंतरची गोष्ट…. तीच मी, तीच श्रुति, तसाच प्रसंग….फक्त अल्बम वेगळा…. श्रुतिच्या लहानपणीचा ….त्यात नेमका माझ्या डोहाळजेवणाचा फोटो होता…माझ्या चौकस कन्येनं लगेच सांगितलं ‘आई, मी तुझ्या पोटात होते नां..?’ मी थक्क, सुन्न…परत एकदा बा.सं.शा, बा.मा.शा…..प्रेमानं (मनातल्या मनात ‘ह्रदय गोळा करून…आता काय ऎकायला मिळतंय्‌…’अशा आवाजात) तिला म्हंटलं ‘अरे वा !! तुला कसं कळालं. कसली हुशार आहेस गं तू…’ . कन्येनं ‘एवढं कसं कळत नाही तुला?’ अशा अर्थाचा एक कटाक्ष टाकला व मला समजावून सांगू लागली ‘आई, तेव्हा नाही का, केतकी मावशीचं पोट खूप मोठं झालं होतं, तू म्हणालीस की तिला बाळ होणार आहे ….. मग नाही का शांभवी झाली….आपण तिच्या बारशाला गेलो होतो….तसंच मी तुझ्या पोटात होते म्हणून तुझं पोट मोठं होतं….’. पुढचा कोंडीत पकडणारा प्रश्न यायच्या आधीच मी तिचं खूप कौतुक केलं. आणि सांगितलं ‘अगं, तुझे फ्रेंड्स तुला खेळायला बोलावतायत. पट्कन फ्रेश हो व खेळायला जा’ . यावेळी तिचे फ्रेंड्स माझ्या मद्तीला आले. ते नसते तर मॅगी , मि.बीन , छोटा भीम , टॉम – जेरी कोणीतरी मद्तीला आलेच असते………पोरं किती लवकर मोठी होतात नां…!! मला खात्री आहे, तिच्या पुढच्या प्रश्नांची उत्तरं ती लवकरच शोधून काढेल….(नाहीतर ‘३ ईडीयटस्‌’  आहेच मदतीला….!!!किमान एका प्रश्नाच्या उत्तरासाठीतरी……)

BTW,यात बा.सं.शा, बा.मा.शा. ला नावं ठेवण्याचा उद्देश अजिबात नाही….या बाबतीत हळव्या लोकांनी मनावर घेऊ नये. केवळ विनोदासाठी याचा आधार घेतला आहे. कृपया गैरसमज नसावा…..