ई-मेल

थांबा , ई-मेल नावावरून मी तुम्हाला बोगस ई-मेल कशा येतात, या फॉरवर्डेड ई-मेल्सनी कसा वैताग आणलाय किंवा दिलेल्या सेरीजच्या पुढचा नंबर ओळखून अ‍ॅटॅच केलेल्या फाईलमध्ये तुमचे नांव टाका अशा प्रकारच्या कथा सांगून बोअर करणार नाहीय्‌. माझा एक वेगळाच प्रश्न आहे, “I have sent you an e-mail” या वाक्याचं मराठीत भाषांतर तुम्ही काय करता? मी तुला एक मेल पाठवलीय्‌ , मी तुला एक मेल पाठवलाय्‌ की मी तुला एक मेल पाठवलंय्‌ ? आता कसं आहे की कुणी आजकाल ई-मेल असं म्हणत नाही तर फक्त मेल असं म्हणतात कारण मेल म्हणजेच ई-मेल हे आपण गृहीत धरलंय्‌. अगदीच बाय पोस्ट काही पाठवायचं असेल तर आपण कुरिअर करतो नाही कां? असो.
तर माझा प्रश्न असा आहे की ती मेल, तो मेल की ते मेल? झालं कन्फ्यूजन ? पूर्वी माझं याबाबतीत नेहमी कन्फ्यूजन व्हायचं. आम्ही इंजिनियरिंगला असताना मुळात इंटरनेट ही नवीन गोष्ट होती आणि त्यात ई-मेल म्हणजे तर खूपच नवीन. त्यामुळे त्याकाळात ( अगदी सोपं सांगायचं तर १२/१५ वर्षापूर्वी ) ई-मेल अकाउंट असणे ही अभिमानाची बाब होती. (आम्ही तेव्हा ई-मेल अकाउंट म्हणायचो , मेल आय्‌डी नाही) “अय्या, तुझं ई-मेल अकाउंट नाहीय्‌? अगं मग काढ नां, मी तुला ई-मेल पाठवते.” असं कॉलेजात रोज भेटणार्‍या मैत्रिणीला सांगायचो. अर्थात तेव्हा ई-मेल पाठवणं ही फार सोपी गोष्ट नव्हती. कारण तेव्हा घरोघरी इंटरनेट नव्हतं. कॉलेजात फक्त काही वेळापुरतेच इंटरनेट वापरायला परवानगी असायची. मग नेट सर्फिंग करायचे किंवा ई-मेल पाठवायचा ( तेव्हा मी ते पत्र सारखं तो मेल असं म्हणायची, मेल हा ती किंवा ते कसं असेल, तो ‘तो’ च असणार असा मे बी यामागे विचार असेल) तर सायबर कॅफेत जाऊन ताशी ४० रू. द्यावे लागायचे. आजकाल कसे गल्लोगल्ली सायबर कॅफे दिसतात तसे तेव्हा नसायचे. हळूहळू ई-मेल असं म्हणणं मागासलेपणाचं वाटायला लागला त्यापेक्षा नुसतं मेल असं म्हणायला आवडायला लागलं. जर कुणी चुकून ई-मेल असं म्हंट्लं तर कळायचं की ये अभी बच्चा है. तर आम्ही कोल्हापुरात तो मेल असं म्हणायचो. त्यावेळी पुण्यात राहणारी माझी मैत्रिण मला म्हणाली, “वैशाली , मी तुला एक मेल पाठवली होती, मिळाली कां?” बाकी कशाकडे माझं लक्ष न जाता, मैत्रिण ती मेल म्हणाली याकडे जास्त लक्ष गेलं आणि ती ‘पुण्यातली’ मैत्रिण होती. नंतर माझा चाळाच होऊन बसला की बोलताना बाकी सगळे काय म्हणतायत्‌ ती मेल, तो मेल की ते मेल? त्यावेळेस जास्तीत जास्त रेटींग ती मेल ला मिळालं होतं.
त्यावेळेस बहुतेकांची ई-मेल अकाउंटस्‌ ही हॉट्मेल नाहीतर याहूवर असायची. कोणत्या वेबसाईटवर किती जास्त स्पेस मिळते हे पाहून तिथे इ-मेल अकाउंट उघडले जायचे. इंटरनेट सिक्युरिटी किंवा इतर फॅसिलीटीज्‌ जसं की चॅटींग, व्हिडिओ कॉलिंग वगैरे गोष्टी तर कोसों दूर होत्या. माझें सर्वात पहिलं अकाउंट हे युएस्‌ए.नेट वर होते कारण जेव्हा त्यावर ७ जीबी स्पेस मिळत होती, तेव्हा याहू, हॉटमेल वगैरे ५० ते ७० एम्‌बी स्पेस देत होते. आता ते अकाउंट बंद केलंय्‌. आजकाल ई-मेल अकाउंट ओपन करताना स्पेस हा क्रायटेरियाच लागू होत नाही कारण बहुतेक वेबसाईटस्‌वर अमर्यादीत जागा उपलब्ध करून दिलेली असते. सध्या मला तर वाटतंय्‌ की जीमेल आय्‌डी नाही अशी व्यक्ती (अर्थात नेट वापरणार्‍यांपैकी) शोधावी लागेल.
संवाद साधण्याचे साधन म्हणून राजेमहाराजेंच्या काळात कबुतरांना प्रशिक्षण देऊन संदेशाची देवाणघेवाण व्हायची. ब्रिटीशांच्या काळात संदेशाची देवाणघेवाण जलद होण्यासाठी पोस्ट ऑफिस ही संकल्पना आली. मला आठवतंय्‌ माझे आजोबा तर सकाळचा काही वेळ हा पत्र लिहण्यासाठी राखून ठेवायचे. या पोस्ट ऑफिसची जागा कुरियरने कधी घेतली हे कळालेच नाही. १०/१५ वर्षापूर्वी जर काही वस्तू सुरक्षितरित्या आणि जलद पाठवायची असेल तरच कुरियर केले जायचे. नंतर हळूहळू पत्रं, लग्नाची निमंत्रणं ही सुध्दा कुरियर केली जाऊ लागली. इंटरनेट्चा जसा प्रसार झाला आणि लोकांना याची उपयुक्तता पटली तेव्हा तर संदेशाची देवाणघेवाण अतिजलद होण्यासाठी ई-मेल , चॅटींग या गोष्टी वापरल्या जाऊ लागल्या. आजकालच्या लहान मुलांना पोस्ट ऑफिस काय असतं हे माहितच नाहिय्‌. शाळेत EVEच्या फिल्ड व्हिजीट मध्ये त्यांना पोस्ट ऑफिस दाखवले जाते. आता तर सोशल नेटवर्किंग साईट्स्‌ मुळे लोकांना ई-मेल वापरही कमी झालाय्‌. मध्यंतरी मी एका पेपरला वाचलं होतं की जसं पोस्ट हे कालबाह्य झालं आहे तसं येत्या काही वर्षात ई-मेल करणं हे ही कालबाह्य होईल. ऑफिशियल काही कामासाठी मेल वापरले जातील पण व्यक्तिगत संपर्काचे माध्यम म्हणून ई-मेलचा वापर खूपच कमी होईल. याची प्रचिती आत्ताच येऊ लागली आहे. ८/१० वर्षापूर्वी नवरा कामानिमित्त जेव्हा परदेशात जायचा तेव्हा संपर्कात राहण्याचे सर्वात स्वस्त माध्यम ई-मेल हेच होते. नंतर स्काईप आलं आणि सगळं चित्रच बदलून गेलं. नेटवर्किंग साईट्स्‌, ब्लॉग्ज, व्हिडीओ चॅटिंग यासारख्या सुविधा असताना ई-मेल चा वापर केवळ आलेल्या ई-मेल फॉरवर्ड करण्यासाठीच होतो. या सगळ्या बदलाचे आपण साक्षीदार आहोत हे काय कमी आहे?

Advertisements

होतं असं कधी कधी….

 

असं कधी कधी होतं नां की एखादा दिवस हा खूप दगदगीचा, वैतागाचा जातो. माझा परवाचा शनिवार असाच होता. सकाळी चक्क सगळी कामं लवकर आवरून झाली. मग छान मूडमध्ये विचार आला की बरेच दिवसांपासून जी काही छोटी मोठी खरेदी करायची राहिली आहे, ती आज ऑफिसमधून लवकर निघून करून टाकू. हाच हाच तो क्षण ज्याने सुरवातीचा आनंदी मूड हा वैतागात बदलला ( आता असं वाटतंय्‌ तेव्हा मात्र वाटलं होतं की वा! काय मस्त प्लॅनिंग केलं आहे. ) झालं मग मेन रोडला जाऊन खरेदी करायची तर माझी स्कूटी घेऊन जाणं जरूरी होतं. आजकाल मी बसनंच ऑफिसला जाते, अगदीच काही कारण असेल तरच स्कूटी नेते. कारणइथे वाचा . त्यामुळे गाडीत पेट्रोल संपत आलंय्‌ हे लक्षात नव्हतं.

ठरवल्याप्रमाणे ऑफिसमधून लवकर बाहेर पडले, मेन रोडला गेले. आमच्या भागात ज्या झाडूची किंमत ७० रू. सांगितली होती, त्यापेक्षा जास्त चांगला झाडू ५० रू. ला मिळाला. लगेच स्वतःची पाठ थोपाटून घेतली. खरेदी करायचा उत्साह अजून वाढला. नवीन टेबलक्लॉथ घ्यायचाय्‌ असं बरेच दिवसांपासून घोकत होते. मेनरोडला सर्व प्रकारचे कव्हर्स मिळणारे एक नवीनच झालेले दुकान दिसले. मग माझा मोर्चा तिकडे वळवला…. वेगवेगळ्या प्रकारची कव्हर्स, टेबलक्लॉथ वगैरे पहात होते, तेवढ्यात काय झाले माहीत नाही पण डोळ्यांसमोर हळूहळू अंधारी यायला लागली, सगळं दुकान माझ्याभोवती गरगर फिरायला लागलं, मला चक्कर येतेय हे लक्षात आल्यावर मी तिथल्या सेल्समनला म्हंटलं, “भैया कुछ बैठने के लिए है क्या ? मुझे चक्कर आ रहा है”. आता नवल वाटतंय्‌ की मला हे म्हणायला कसं सुचलं? सिनेमात दाखवतात तसं मी धाडकन्‌ पडले कशी नाही? तसा मला चक्कर येण्याचा फार अनुभव नाही. आणि काल चक्कर यायला काही कारण पण नव्हतं. नाष्टा, जेवण सर्व वेळेवर करून मग मी बाहेर पडले होते. कदाचित उन्हामुळे असेल… असो. आत्ता जे इथे लिहलंय्‌ ते सगळे विचार मी थोडीशी सावरल्यावर मनात आले. थोडं पाणी पिल्यावर बरं वाटायला लागलं. मग तिथून टेबलक्लॉथ घेतला , अजून थोडी खरेदी केली आणि तिथून निघाले. त्या दुकानदाराने विचारले, ” आप ठीक तो है नां , इस्कूटी पे जाओगे कैसे?” श्रृती यायच्या आत मला घरी पोचायचं होतं त्यामुळे तशीच निघाले. तसा अजून १५ मि. अवकाश होता. तसं बरंच जड सामान , एका साईडला झाडू अशी माझी वरात निघाली स्कूटीवरून…

ओव्हरब्रिजवरून खाली उतरले आणि स्कूटी आचके द्यायला लागली. गाडी रिझर्व्हला आलीय वाटतं असा विचार करून गाडी साईडला घेतली आणि पेट्रोलकॉक पाहीला तर तो ऑलरेडी रिझर्व्ह वर होता. माझ्या गाडीतले पेट्रोल संपले होते. चक्कर आल्याने आधीच थोड्ं अस्वस्थ वाटत होतं त्यात गाडीतलं पेट्रोल संपलेलं, जवळपास पेट्रोलपंप नाही, घड्याळाचे काटे पुढे सरकायला लागलेले, श्रृती आता पाच मिनिटांत घरी येईल, काय करायचं. मग लगेच डिसिजन घेतला की गाडी इथेच लावून रिक्षाने घरी जायचे. त्यातल्यात्यात थोडं डोकं चालवून, जवळच असणार्‍या मोठं हॉस्पिटलच्या जवळ स्कूटी लावली. हातात झाडू, जड पिशव्या, मनात वैताग,चरफड आणि मी पहातेय्‌ रिक्षाची वाट… मेली एक रिक्षा रिकामी दिसेना आणि जवळच्या रिक्षास्टॉपवरच्या रिक्षावाले कमी अंतर आहे म्हणून घरापर्यंत यायला तयार नाहीत. टेंशन वाढत चालले होते. तेवढ्यात समोरून एक रिक्षा येताना दिसली. पण ती शेअर-रिक्षा होती, ती काही घरापर्यंत आली नसती, जवळच्या स्टॉपपासून मला घरी चालत जायला लागणार होतं पण अजून वाट पहाणं परवडणार नव्हतं. हातात झाडू, जड पिशव्या, मनात वैताग,चरफड, रणरणणारे ऊन ,जवळचे पाणीही संपलेलं, त्यात अजून वैताग की घरी जाण्यासाठी तीन मजले चढून जायचेय्‌ (आमच्या अपार्ट्मेंटला लिफ्ट नाहीय्‌) … चालत चालत चालत मी घरी पोचले, दुसर्‍या मजल्यापर्यंत पोचतेय्‌ तेवढ्यात श्रुतीचा आवाज ऐकू आला. हुश्श…. केलेली खरेदी बघायचाही उत्साह उरला नव्हता. अजून परत जाऊन स्कूटी घेऊन यायची होती. तासाभरात निघू असा विचार करून थोडी झोप काढली.

उठल्यावर बघते तर पावसाला सुरवात झाली होती…. अरे मगाशी थोड्यावेळापूर्वी ऊन मी म्हणत होतं आणि आत्ता मुसळधार पाऊस!!! श्या काय चाललंय्‌ हे ? जसजसा वेळ जाऊ लागला तसतसे मनात काहीबाही विचार येऊ लागले.मी हॉस्पिटलजवळ गाडी लावून आता चार-पाच तास होऊन गेलेत…. सध्याचे दिवस किती वाईट आहेत…. कुणी गाडीला काही केलं तर? बेवारस गाडीतच बॉम्ब वगैरे असतात नां ! ती माझी गाडी आहे हे मला माहीत आहे पण त्या एरियाला ती गाडी अनोळखी आहे, बराच वेळापासून ती गाडी तिथेच आहे, बेवारस गाडी म्हणून कुणा तत्पर नागरिकाने पोलिंसांना कळवले तर? मनात शंकाकुशंकांनी थैमान घातले. मी चक्क टी व्ही लावून लोकल न्यूज चॅनलवर पाहिले अशी काही बातमी दिसतेय्‌ कां ते!!! पावसाचा जोर जरासा कमी होताच रिकामी बाटली घेऊन श्रृती आणि मी पहिल्यांदा पेट्रोलपंपापर्यंत गेलो, पेट्रोल घेतले, मग उलट दिशेने जाणारी रिक्षा शोधायला लागले. नशिबाने रिक्षा लवकर मिळाली. परत त्या हॉस्पिटलजवळ पोचेपर्यंत धीर निघत नव्हता…. गाडी मी जशी लावली होती, तशीच ती आहे हे बघून जिवात जीव आला. पेट्रोल टाकून गाडी चालू झाल्यावर एक सुटकेचा निश्वास सोडला…. आता घरी जाऊन संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे करणे शक्यच नव्हते. नवर्‍याला फोन करून एका नेहमीच्या ठिकाणी यायला सांगितले. नवर्‍याला भेटल्यावर सकाळपासून काय काय झालं ते बोलून टाकलं…. खरंतर चक्कर आलीय हे सांगायला नको होतं कारण तो उगाच काळजी करत बसतो. आता डॉक्टरकडे जाऊन सगळं चेकअप करू म्हणून मागे लागलाय्‌. असो. सगळं ऎकून झाल्यावर तो म्हणाला “मग कुठे जाऊया जेवायला?” बस्स !! आवडत्या हॉटेलात मनासारखं जेवण झाल्यावर (मनासारखी खरेदी झाली होतीच ती आत्ता जाणवली) दिवसभराचा वैताग , शीण , मानसिक / शारिरिक थकवा कुठल्या कुठे पळून गेला…..

 

हजारो धन्यवाद

 

माझा ब्लॉग सुरू करून सव्वा वर्ष झालं…. वेळेअभावी ( उर्फ प्रतिभेअभावी )फार काही लेख लिहून झाले नाहीयेतआज मी माझा ब्लॉग पाहिला आणि लक्षात आलं की अरे, आपल्या ब्लॉगला दहा हजाराहून जास्त लोकांनी भेट दिली आहे. तर माझ्या सर्व वाचकांना धन्यवाद देण्यासाठी ही आजची पोस्ट ….तन्वी, महेंद्रकाका, देवेन, सौरभ, हेरंब, हेमंत, सुहास अशा ब्लॉगर्सनी सातत्याने कौतुकाची शाबासकी दिली. याशिवाय कितीतरी अनोळखी वाचकांनी पोस्ट आवडल्याचे आवर्जून सांगितले आणि प्रतिकिया देऊन, पोस्टला सबस्क्रिप्शन देऊन माझा लिहण्याचा उत्साह वाढवला.. 🙂 🙂

सर्वात महत्वाचे आभार  मराठी ब्लॉग विश्वचे ज्यांनी माझ्यापर्य़ंत १६५९ वाचक (आतापर्यंत) पोचवले आहेत 🙂 आणि अर्थात गुगलदादाचे 🙂 ज्याचा वापर करून वेगवेगळ्या शब्दांनी शोध घेत वाचक जीवनतरंगवर आले. कोणकोणत्या शब्दांनी शोध घेत लोकं या साईटवर पोचले हे पाहिलं तर आश्चर्य वाटतं. कॉम्प्युटर, व्यसन, रंगकाम, सासू, प्रोत्साहन, अल्बम,नेटवर्किंग, हलवा, लग्न विश्वास, मोटीव्हेशन यासारखे शोध घेत येणार्‍यांना त्यांच्या शोधपूर्तीचे समाधान मिळाले असेल. मात्र ताईला शू आलीया व अशासारख्या शब्दांची लिंक या साईट्पर्यंत कशी काय पोचते हे मलाच शोधावे लागेल. ( आणि हे वाक्य कशाला कोण सर्च करेल?)असो. तर जीवनतरंगला भेट देणार्‍या, प्रतिक्रिया देणार्‍या सर्वांचे मनापासून आभारअसाच लोभ ठेवून माझा लिहण्याचा उत्साह वाढ्वाल अशी विनंतीवजा अपेक्षा….. 🙂

तशी मी फार बडबडी नाहीय्‌ आणि बोलून मोकळं होणं हे मला फार जमत नाही. मला असं वाटतं की माझे हे गुण (/अवगुण) माझ्या लिखाणातही येतात. त्यामुळे माझ्या सुरवातीच्या काही पोस्ट वाचताना मला असं वाटलं की विषय चांगला आहे पण मी जे काही लिहलंय्‌ ते अजून फुलवता, खुलवता आलं असतंब्लॉग लिहण्याचा माझा व्यक्तीगत फायदा असा झाला की विचारात आणि पर्यायाने लिहण्यात अधिक सुसुत्रता येत गेली. आपण जसा विचार करतो तसं आपण लिहतो असं मला वाटतं. माझ्या लिहण्यातून मला समोरच्या व्यक्तीपर्यंत काही मत, विचार, अनुभव, वास्तव, निरीक्षणें पोचवायची असतील तर ते लिखाण समजायला सोपे हवे आणि ते सोपे करण्यासाठी जास्त सलग, सुसुत्र आणि स्पष्ट हवे. म्हणजेच माझे विचार सलग, सुसुत्र आणि स्पष्ट हवेत. आणि जसंजसं जास्त लिहू तसतसं विचार करण्याची पद्धतही परिपक्व होत जाते असं माझ्या लक्षात आलंय्‌. अर्थात विचार करण्याची योग्य पद्धत आणि योग्य विचार यांत बरेच अंतर आहे. मात्र योग्य विचारांपर्यंत पोचण्याची ही पहिली पायरी आहे असे म्हणता येईल. लिहण्यातला आनंद घ्यायला मी शिकतेय्‌. So Happy Writing to myself…

  

बस (च)…..

“अगं हे काय प्रज्ञा, आज चालत? गाडी (पक्षी : स्कूटी) सर्व्हींसिंगला दिलीय कां?” किमान १५ जणांनी तरी हा प्रश्न गेल्या महिन्याभरात मला विचारला असेल…

त्याचं काय झालं की मागच्या महिन्यापासून ऑफिसला जाताना मी स्कूटी न नेता बसने जायला लागले. जेव्हा सुरवात केली तेव्हा सकाळी सकाळी माझ्या स्कूटीचे मागचे चाक पंक्चर झाले होते. ऑफिसला उशिर होत होता म्हणून मी मेनरोडपासून शेअर-रिक्षा पकडू असे ठरवले. आणि चक्क मेनरोडला पोचल्यापोचल्या २ मिनिटात सिटी बस आली…. अजून एक सांगायचे म्हणजे नाशिकला साधारण वर्षभरापूर्वी नविन सिटी बस आणल्यात. छान चकाचक, उभे राहण्यासाठी किंवा बसण्यासाठी ऎसपैस जागा आणि महत्वाचे म्हणजे बसमध्ये संयत आवाजात वाजणारा FM रेडीओ….अशा छान छान बस काही ठराविक रूटवर चालू केल्या आहेत…ऑफिसमधल्या बहुतेकजणींनी अशा बसने प्रवास करून काय मस्त बस आहे, बसमध्ये किती छान वाटतं, मस्त गाणी ऎकत आपला स्टॉप कधी येतो ते कळतच नाही… असं सांगून सांगून मला जळवलं होतं… आणि तशातलीच एक छान बस माझ्यासमोर आल्यावर मी संधी दवडली नाही आणि बसने ऑफिसला जायचे ठरवले…मग तिकिट काढताना कळले की बसचा प्रवास किती economical आहे ते…..उतरताना कळाले की अरे, आपल्या ऑफिसच्या दारात तर बसचा स्टॉप आहे … त्यादिवसापासून ठरवूनच टाकले की आता रोज बसनेच ऑफिसला जायचे….

इतकी वर्षे बाहेर कुठेही जायचं असलं तरी स्कूटीशिवाय माझं प्रस्थान व्हायचं नाही… साधं कोपर्‍यापर्यंत जायचं असलं तरी स्कूटी… ही सवय मला मोडायचीच होती. मग मी घेतलेला, किमान ऑफिसला तरी बसनं जायचं हा निर्णय योग्य कसा आहे ते मलाच पटवणारी काही कारणं मी शोधलीयत्….

१. पेट्रोलचे भाव किती वाढलेत… आता एकट्याला जाण्यासाठी स्कूटी परवडत नाही.

२. बसचा स्टॉप ऑफिसच्या अगदी दारातच आहे.

३. घरून जाताना बसच्या स्टॉपपर्यंत जरी चालावे लागले तरी फक्त ५ ते ७ मिनिटेच चालावे लागते. चालणं आरोग्यासाठी, फिटनेससाठी चांगलंच…

४. ‘परिघ’ हळूहळू आकुंचन पावतोय हे लक्षात येतंय्…. ५ ते ७ मिनिटे चालल्यावर एवढा परिणाम मग ऑफिसला चालतच जाऊ कां?

५. स्कूटीने जायला १० मिनिटे लागतात तर बसने १५ …. ठीक आहे … फार काही फरक नाही…. इतर मोठ्या शहरातल्या लोकांना तर ३० ते ४५ मिनिटांचा ट्रॅव्हल करून ऑफिसला जावे लागते… त्यामानाने मी किती सुखी आहे…

६. परत येताना बहुतेकदा बस उशिरा येते. पण स्टॉपवर नुसतं थांबलं तरी इतरांच्या गप्पा ऎकण्यात छान वेळ जातो… आणि माझ्या ऑफिसच्या जवळच्या स्टॉपवर खूप कॉलेजचे , शाळेचे विद्यार्थी असतात, त्यांच्या गप्पा ऎकणं हा मस्त टाईमपास आहे.

७. जरी कुणाच्या गप्पा नाही ऎकू  आल्या तरी येणार्‍याजाणार्‍यांचं निरिक्षण करण्यात , त्यावरून काही तर्क बांधण्यात छान वेळ जातो… (सध्या मी ‘संपूर्ण शेरलॉक होम्स’ वाचतेय्… त्यामुळे असं निरिक्षण करण्याची , त्यावरून तर्क करण्याची खोड लागलीय…)

८. येताजाताना वाटेतली काही कामं करायची असतील तर स्कूटी बरी पडते. असा विचार मनात आल्याक्षणीच कायकाय कामं करायची असतात याची लिस्टच काढली. पेट्रोल भरणे, भाजी / फळं / वाणसामान आणणे, श्रृतीच्या शाळेत टीचरला भेटायला जाणे, वगैरे…नंतर लक्षात आलं की यातली बरीचशी कामं ऑकेजनली करावी लागतात…काही कामं घरी येऊन नंतर केली तरी चालतात. त्यामुळे या कारणासाठी बसने जाणं रद्द करायची गरज नाही. फारतर अशा एखाद्या वेळेस स्कूटीनं जाऊ…

९. आता पावसाळ्यात तर स्कूटीपेक्षा बसने जाणं केव्हाही चांगलं…. एकतर नव्या बसेस गळक्या नाहीयेत्‌… स्कूटीवरून पावसात जायचं म्हणजे गाडी स्लो चालवावी लागते नाहीतर गाडी स्लीप होण्याचे चान्सेस जास्त… तो रेनकोट घाला , काढा हा वैताग …घरून निघताना पाऊस नाही म्हणून रेनकोट घातला नाही आणि थोड्ं पुढे गेल्यावर पाऊस लागला तर वाटेत कुठेतरी गाडी थांबवून रेनकोट घालावाच लागतो…हा प्रकार मलातरी वैतागवाणा वाटतो… (आता जरा जास्तच असं वाटू लागलंय्…)

१०. जरा चार लोकांमध्ये मिसळता येतं.. बसमधून ये-जा करताना तर काही काही नमुने भेटतात… मग परत माझ्यातला शेरलॉक होम्स जागा होतो….

११. बसची वाट पहाण्यामुळे पेशन्स वाढतो… पेशन्स इज अ ग्रॆट स्ट्रेंग्थ यु नो… माझी चिडचिड हल्ली कमी झालीय् वाटतं….  

१२. आणि सर्वात महत्वाचे कारण – होता होईल तितका पर्यावरण रक्षणाला हातभार लावता येतो. माझ्या स्कूटीचं PUC आहे हो!! पण स्कूटी न नेता बसने गेले तर तेवढीच पेट्रोल बचत पर्यायाने उर्जा बचत आणि ०.००००००१% ने का असेना , प्रदुषण कमी….आणि तेवढाच पर्यावरण रक्षणाला हातभार…. आपण काही ‘Go Green’, ‘Green India’ , ‘Save Trees’ असा जागतिक संदेश देणारे टि-शर्टस्‌ घालून पर्यावरणाचे रक्षण करा असे सांगायला डोल्लेशोल्ले असणार्‍या अभिनेत्यासोबत रॅम्पवर नाही चालणारोत… तेव्हा कृतीतून पर्यावरणचे रक्षण केलेले चांगलें … कसें? (पुणेरी स्टाईलमध्ये अनिनासिक स्वरात ‘कसें’ हा शब्द वाचला तर या मुद्याचे महत्त्व जास्त कळेल…)

 बघा एवढे सारे फायदे मला जाणवले… ते ही एका महिन्यांत…. मग योग्यच आहे बसनं जाणं येणं…

चला बाय् बाय्… बसची वेळ झालीय्…

सुविचाराचे धन….

 

ई-मेल्स्‌, एसेमेस्‌ या गोष्टी फॉरवर्ड करण्याच्या असतात. अगदी काही महत्वाचे , घरगुती किंवा ऑफिशियल असणारे ई-मेल्स्‌, एसेमेस्‌ सोडले तर आपण बहुतेकदा आलेले ई-मेल्स्‌, एसेमेस्‌  फॉरवर्ड करत असतो. किंवा मी तर असेच करते. मला कधीकधी प्रश्न पडतो हा जो ई-मेल्‌, एसेमेस्‌  मला कुणीतरी फॉरवर्ड केला आहे, तो सर्वात पहिल्यांदा कुणी बरं लिहला असेल? बहुतेक ई-मेल्स्‌, एसेमेस्‌  हे कोणत्यातरी वेबसाईटवरून उचलेले असतात…. वॉलपेपर्स, चित्रं, काही इल्यूजन्स , पेंटींग्ज, काही डिस्काऊंट ऑफर्स, काही नीतिकथा आणि “ओळखा पाहू या सेरीज पुढचा नंबर कोणता?” या प्रकांरांमधले हे फॉरवर्डेड ई-मेल्स असतात. असं बर्‍याचदा होतं की मला आलेला छानसा ई-मेल मी कोणालातरी फॉरवर्ड करते आणि काही दिवसांनंतर घुमून-फिरून तोच ई-मेल मला परत येतो.

एसेमेस्‌चंही तसंच असतं पण ई-मेलसारखे एसेमेस्‌ फुकट नसतात. काही मोबाईल कंपन्या एसेमेस्‌ पॅकेज देऊन दिवसाला २० पासून महिन्याला ५००० पर्यंत एसेमेस फुकट किंवा १० पैसे, २० पैसे पर एसेमेस अशा किंमतीत देऊ करतात. काही दिवसांपूर्वी मला या GM , GN SD TC च्या एसेमेस्‌नी वैताग आणला होता. सुरवातीला मजा म्हणून किंवा फुकटच आहे म्हणून मी सुद्धा हे GM , GN SD TC चे मेसेजेस फॉरवर्ड केले पण नंतर कंटाळा आला. रोज काय चंद्र , तारे, चांदण्या, सुगंध , जाई-जुई, रातराणी असल्या गोष्टींना वेठीला धरायचं आणि कुणालातरी ‘गुड नाईट’ विश करायचं…. बोअर…. आणि मी GM , GN SD TC चे मेसेजेस फॉरवर्ड करणं बंद केल्यावर आपोआप मलाही असे मेसेज येणं बंद झालं. (कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है , करोगे तो भरोगे असं काही…)पण काही मेसेज मात्र खरंच खूप सुंदर असतात, खूप निराश झालेली असताना मैत्रींणीने पाठवेला छानसा ‘मोटीव्हेशल’ मेसेज काळ्या ढगाला असणार्‍या सोनेरी कडेची आठवण करून देतो. (खूप साहित्यिक झालेय हे वाक्य पण दुसरी उपमा आठवेना…) काही मेसेज वाचून खुदकन्‌ हसू येते (यांत सँटा-बँटा किंवा तत्सम लोकांचा सहभाग नाही…या कृ. नों. घे.). मी तर अशा छान छान मेसेजेस्‌चं कलेक्शन करून ठेवलंय्‌….

यावरून लहानपणीची एक आठवण झाली. तेव्हा रोज वर्गात फळ्यावर सुविचार लिहायचा असायचा. मग आम्ही एक सुविचाराची वही केली होती आणि त्यात वेगवेगळे सुविचार, संतवचने वगैरे लिहलेली असायची, शिवाय शाळा सुटल्यावर सर्व वर्गात फिरून प्रत्येक वर्गातले सुविचार त्यात लिहायचे, दुसर्‍या शाळांमधल्या मैत्रीणींबरोबर या सुविचारांची देवाणघेवाण चालायची आणि आपल्यालाच सुविचार लिहता यावा म्हणून रोज शाळेत लवकर जायची… सगळ्यात पहिल्य़ांदा वर्गात पोचायची घाई असायची… कारण जो कुणी पहिल्यांदा येईल त्यालाच सुविचार लिहण्याचा ’मान’ मिळायचा!!!

तर मी अशा छान छान मेसेजेस्‌चं कलेक्शन करून ठेवलंय्‌. त्यातले काही मला जाम आवडलेले मेसेजेस मी इथे लिहीत आहे. अर्थात यातले काही, बरेचसे किंवा सगळे मेसेज तुमच्याकडे असतील.. सगळे मेसेजेस हे इंग्रजीमधून आहेत आणि त्याच भाषेत त्यातला खराखुरा मेसेज… अर्थ मनापर्यंत भिडतो म्हणून ते तसेच देत आहे. 

1. END is not the end, infact E.N.D is Effort Never Dies & if u get No in any answer, remember it is ‘Next Oppurtunity’. So always be positive.

2. Patience and silence are two powerful energies! Patience makes you mentally strong while silence makes you emotionally strong.  (हा मेसेज माझ्या नवर्‍याने पाठवलाय्‌ आणि तो फॉरवर्डेड नाहीय्‌… त्यानेच लिहलाय तो… अशाच एका घरगुती Patience आणि silence ची कसोटी पाहणार्‍या काळात हा मेसेज त्याने पाठवला आणि झालेल्या घटनांकडे मी शांतपणे, त्रयस्थाच्या नजरेतून पाहू शकले… )

3. Charlie Chaplins 3 heart touching statements- a. Nothing is permenant in the world, not even your troubles.. b. I walk in d rain bcos nobody can see me tears !! c. The most wasted day in the life is the day when we have not laughed…

4.Friends are like sketch pens, they colour ur life. I may not be ur favourite colour, but you will need me somewhere to complete ur picture… (काय जबरदस्त आहे नां)

असाच एक जबर्‍या मेसेज

5. if everyone is happy with U, then surely u have made many comromises in ur life. But if U r happy with everyone surely you had ignored faults of others…

6. D stone is broken by last stroke, it doesn’t mean that first stroke was useless… Success is the result of continuous efforts, Try & try untill you win…( आपल्या नेहमीच्या try try but don’t cry चा modified version!!!!)

7. Don’e make your voice loud , to make others to listen you. Make ur attitude so loud that others beg to listen u…(जबराट्‌)

8. On a rainy day mom went to pick up her con from school thinking he will fear d lightning. On d way she found him at the sky for every stroke of ligntning. she asked him why? he smiled n said “GOD is taking my photo. I have to look good. that’s why i smiled”. Life is simple, it’s d attitude which makes it complicated. So smile when u have a problem and keep smiling even during hard times. Nothing in the world can break u…

9. some one asked swami vivekanand :- WHAT IS A POISON? he gave a great answer, “Anything that exceeds its limit is called Poison…”

and cherry on the top….

10. worry is like a rocking chair. It gives you something to do but it doesn’t get you any where. So DON’T WORRY BE HAPPY….

 

नांवात काय आहे?

नांवात काय आहे?…….शेक्सपियरला पडलेला प्रश्न…..

कु. वैशाली दुष्यंत कुलकर्णी आणि सौ. प्रज्ञा रविंद्र महाजन…. यात साम्य काय आहे? तर ती अस्मादिकांची नावें आहेत. माझं बॅंकेत खातं चालू करायचं होतं तेव्हा पुराव्यासाठी जी कागदपत्रे जमा केली होती, त्यात काही कागदपत्रे कु. वैशाली दुष्यंत कुलकर्णी या नांवाची होती. मग दोन्ही नावांची व्यक्ती एकच आहे हे दाखवण्यासाठी मॅरेज सर्टीफिकेट, पॅन कार्ड पुरावा म्हणून द्यावे लागले….लग्नानंतर मधलं नांव बदलणार हे मुलींच्या बाबतीत होत असतं….काही भाग्यवान अशा असतात की त्यांना सासरपण माहेरच्या आडनावांचं मिळतं…. एखादी थ्री ईडीयट्स मधली करीना सांगते – वांगडू….? नहीं नहीं, मै शादी के बाद अपना सरनेम चेंज नही करूंगी….. 🙂 अशांचं प्रमाण हळूहळू वाढतंय्‌ असं म्हणतात बुवा…. 🙂 (आजचा मुद्दा  हा नाहीय्‌.)

माझ्याबाबतीत नांव, मधलं नांव, आडनांव सगळंच बदललं…. माझ्या नणंदेचं नांवही वैशाली त्यामुळे माझं नांव बदलावंच लागलं. तेव्हा नवरा म्हणाला होता- तुला वैशाली म्हणून हाक मारली तर बहिणीला हाक मारतोय असं वाटेल. 🙂 (शेक्सपियर बाबा ऎकतोयस्‌ नां, नावांत काय आहे, कळालं कां…..?) मग नवर्‍याने सांगितलं की आता तुला तुझ्या आवडीचं नांव मिळेल. तुला आवडणारी नावं सांग. मी त्यातलं एखादं निवडतो . कारण ते नांव तुझं असलं तरी शेवटी ते जास्त वेळा मी म्हणणार आहे… 🙂 वॉव … हा दृष्टीकोन आवडला मला. मी नाही माझं नांव बदलणार यापेक्षा बदलावंच लागणार आहे तर आपल्या आवडीचं नांव कां निवडू नये? बारशाला जेव्हा आई, बाबा, आत्या किंवा घरातील कोणी वडीलधारे नांव ठरवतांत तेव्हा आपल्याला चॉईस नसतो. ते त्यांच्या आवडीचं नांव ठेवतात. मग मला संधी मिळतेय्‌ तर चांगलं मनासारखं नांव ठेवून घेऊ.  🙂  असा विचार मी तेव्हा केला…. या गोष्टीला १० वर्ष झाली असली तरी आत्ता कालपरवा घडल्याप्रमाणे सगळं लख्ख आठवतंय्‌….. 🙂  त्यावेळी मला ‘ई’ कारान्त नावं आवडायची नाहीत, माझं नांव मोठ्ठं आहे असं वाटायचं. माझं स्वतःचं नांव ‘ई’ कारान्त- वैशाली होतं म्हणून असेल कदाचित… म्हणजे कसं आपले केस सरळ असतील तर कुरळे केस आवडतात, किंवा डोळे काळे असतील तर घारे डोळे आवडतात तसं….. 🙂 मला ‘आ’ कारान्त नावं आवडायची म्हणजे श्रध्दा, आकांक्षा, शलाका, विशाखा वगैरे…. त्याप्रमाणं मी काही नावं नवर्‍याला सुचवली… त्यानं ‘प्रज्ञा’ नांव सुचवलं म्हणाला तुला आवडतंय्‌ कां बघ….!!! हाय्‌….तेव्हाचे काय मोरपंखी दिवस होते की तो जे म्हणेल ते आवडायचंच….. 🙂 ( असो, हाही आजचा मुद्दा नाहीय्‌) तर मला नांव आवडलं – माझ्या सगळ्या अटींमधे बसणारं… ‘आ’ कारान्त , छोटं आणि सहजासहजी अपभ्रंश न करता येणारं….

आमचं लग्न ठरल्याठरल्या माझं नांव काय ठेवायचं हे ठरवलं गेलं. त्यावेळी जेव्हा ‘तिकडून’ फोन यायचा आणि चुकुन माझ्याऎवजी माझ्या आई-बाबांनी फोन उचलला तर ‘प्रज्ञा आहे कां, तिच्याकडे फोन देता कां?’ अशी विचारणा झाली की त्यांना थोडं गोंधळायला व्हायचं. हळूहळू त्यांनाही मला ‘प्रज्ञा’ म्हणून बोलावलेलं ऎकायची सवय झाली. माझं मन तर आता असं तयार झालं आहे की नाशिकला कुणी मला वैशाली म्हणून हाक मारली तर पटकन्‌ ‘ओ’ दिली जात नाही. माहेरी गेले की तिकडे सगळे ओळखीचे, नातेवाईक, मैत्रिणी, शेजार-पाजारचे मला ‘वैशाली’ म्हणूनच बोलावतात आणि इकडे सासरी सगळे ‘प्रज्ञा’ म्हणूनच बोलावतात…..‘वैशाली’ अशी हाक ऎकली की “काय गं? थांब गं थोडी, येतेय नां मी….!!” असं म्हंटलं तरी चालतं पण ‘प्रज्ञा’ अशी हाक ऎकली की “ओ, आले हं….”(एकदम नाजूक, गोड आवाजात वाचा म्हणजे तसा फिल येईल…) असं आपसूकच उत्तर येतं आणि हा स्वीचओव्हर इतका नकळत होतो…..

खरंच आपण बायकाच एवढं ‘अ‍ॅडजेस्ट’ करून घेऊ शकतो… 🙂 (हा तर सर्वकाळचा मुद्दा आहे नां!!!)


 

शिस्त…..

 

ट्रॅफिकचे नियमांचं पालन करायचं असतं कां?

काल मी एका ट्रॅफिक सिग्नलवर तो सिग्नल हिरवा व्हायची वाट पहात होते त्या ३०-३५ सेकंदात जे घडलं ते पाहून वरचा प्रश्न माझ्या मनात आला. तर काल घरी जाण्यासाठी निघाले तेव्हा नाशिकच्या अगदी मेन रोडवर सिग्नलसाठी थांबावे लागले. आता या सिग्नलवर (चक्क !) चालू असलेल्या ‘टायमर’ मुळे कळाले की सिग्नल सुटायला अजून ५१ सेकंद बाकी आहेत. मग स्कूटीचे इंजिन बंद करून सिग्नल सुटायची वाट पहात थांबले. हळूहळू वाहनांची गर्दी वाढायला लागली. सिग्नल सुटायला ३१ सेकंद बाकी असताना तीन बाईकस्वार आले. म्हणजे एकाच बाईकवर तिघेजण होते आणि जोरजोरात , कर्णकर्कश्य हॉर्न वाजवत , बाकीच्या वाहनांना सरकून जागा द्यायला लावत ते पुढे आले.  सिग्नल सुटायला अजून २७ सेकंद बाकी होते. मग “च्याxxx, एवढा वेळ वेट कोण करणार?” असं म्हणत तो सिग्नल तोडून पुढे निघाले, जात असताना मागच्यांना मूर्खात काढायला विसरले नाहीत. आता परिस्थिती अशी होती की आमच्या उजव्या बाजूचा सिग्नल संपून ३ सेकंद झाले होते तरीही तिकडची वाहने जाण्याचे थांबले नव्हते, आमच्या समोरचा सिग्नल चालू होता आणि तिकडूनही वाहने जाणे चालू होते, तशात हे ‘सिग्नल तोडे’ मधे घुसलेले…..त्या तिघांनी जोरजोरात , कर्णकर्कश्य हॉर्न वाजवत वाजवत पुढे जाणे चालू ठेवले, बाकिच्यांनी त्यांचा उद्धार चालू केला तरी त्यांना काही फरक पडत नव्हता , कारण त्यांना असं किती अंतर पार करायचं होतं ? (आणि महत्वाचं म्हणजे भारत-पाकिस्तान मॅच थोड्याच वेळात चालू होणार होती नां?) इतर कुणाच्या लक्षात येईपर्यंत ते दुसर्‍या टोकाला पोचले सुध्दा आणि निघूनही गेले. मग आमच्यासारखे जे अजूनही सिग्नल सुटायची वाट पहात होते, त्यांच्यात आपापसात बोलणं चालू झालं ,”पाहिलंत, काय ती पोरं”, “च्याxxx, आपण काय वेडे म्हणून सिग्नल सुटायची वाट पहात थांबलोय कां?” , “कानाला धरून एकेकाला ट्रॅफिकचे नियम शिकवायला पाहिजेत”, “बापाकडे पैसा असेल चिक्कार , मग सुचतात असले धंदे. “……

खरंच रहदारीचे नियम हे प्रत्येकाला माहिती असतात पण त्याचं पालन मात्र आपल्या सोईनुसार, स्वभावानुसार, सव‌यीनुसार केलं जातं. आमच्या ऑफिसच्या उजव्या बाजूचा रस्ता हा फक्त जाण्यासाठी वन-वे आहे आणि डाव्या बाजूचा रस्ता मागच्या रस्त्यावरून येण्यासाठे वन-वे आहे. पण प्रत्येकालाच घाई एवढी असते की तो वन-वे चा बोर्ड पहाण्याइतकाही कुणाला वेळ नसतो. थोडंसंच अंतर जायचं म्हणून चुकिच्या दिशेने वाहने चालवली जातात. जोराजोरात हॉर्न वाजवत १००-१२० च्या वेगात वाहन चालवणं, पुढे जाताना मागच्या वाहनाला ‘कट’ मारून पुढे जाणं हे तर खूप कॉमन झालंय्‌…आपल्याला पुढे उजव्या/डाव्या बाजूला वळायचं आहे, तर आपले वाहन थोडं आधीपासूनच त्या दिशेला चालवणं हे योग्य असतं. कळतंय्‌ पण वळत नाही. अर्थात या नियमांचं पालन हे आवर्जून केलं जातं पण कधी ? तर ‘मामा’ आपल्या नजरेच्या टप्प्यात असेल तर एरवी चलने दो. मग जे प्रामाणिकपणे नियम पाळतात, त्यांनाही कधीतरी वाटतंच की “अरे,आपणच काय घोडं मारलंय्‌ म्हणून आपण शिस्तीत वागायचं?” मग तेही ह्ळूहळू नियमांचं उल्लंघन करू लागतात. (सगळेच असं करत नाहीत. याची कृ. नों. घ्या.)

शेवटी शिस्त पाळणं हे आपल्याच फायद्याचं असतं. वरच्या प्रसंगात जर काही अपघात झाला असता तर गाडीचं झालेलं नुकसान भरून येऊ शकेल, पण त्या व्यक्तीला काही दुखापत झाली तर त्याच्या आयुष्यातले काही महत्वाचे तास, दिवस, वर्षे वाया जातात, त्याची मोजदाद कशातही करता येत नाही. आपल्याला स्वत:ला काही झालं तर ठिक आहे, आपल्याच चुकीनं हे घडलं म्हणून पश्चाताप तरी करता येईल पण जर आपल्या चुकीची सजा दुसर्‍या कुणाला भोगावी लागली तर आयुष्यभर ही गोष्ट पोखरत राहते. तेव्हा कृपया रहदारीचे नियम पाळा, जे पाळत आहेत त्यांनी तसंच चांगलं वागणं चालू ठेवा आणि इतरांनाही रहदारीच्या नियमांचं पालन करण्यासाठी प्रवृत्त करा……

(कोणाला सल्ला देण्याएवढी मी मोठी नाहीय्‌, पण कळकळीनं जे सांगावसं वाटलं ते इथं सांगितलेय्‌….)