ईकडे चेन्नईला बदली झाल्यापासून आमचे दर वीकेंडला कुठे ना कुठे भटकणे चालू आहे. पॉंडेचेरी (खरा उच्चार पुडुचेरी) , क्वीन्सलॅंड थीम पार्क , वेल्लोरचे गोल्डन टेंपल अशी काही चेन्नईच्या आसपासची ठिकाणे पाहून झाली आणि एका रविवारी महाबलीपुरम् पाहून आलो. आपण जरी महाबलीपुरम् असे म्हणत असलो तरी याचा स्थानिक उच्चार ममलापुरम् असा आहे.
महाबलीपुरम् म्हणजे शिल्पकृतींचे गाव आहे. बघावे तिकडे देवदेवतांच्या मोठमोठाल्या शिल्पकृती दिसतात. तिथे कृष्णकुंज म्हणून एक स्थान पल्लवाने तयार केले आहे. कृष्ण जन्मापासून कृष्णाच्या आयुष्यातले महत्त्वाचे प्रसंग जसे की कालिया मर्दन , गोवर्धन पर्वत हातावर उचलून घेणे, पांडवांच्या गुंफा हे सर्व प्रसंग तेथे अखंड अशा दगडामधून कोरून काढले आहेत. त्या अखंड अशा दगडावर एकूण १५३ शिल्पे कोरलेली आहेत. आणि प्रत्येक शिल्प हे कलाकुसरीचा उत्तम नमुना आहे.
कृष्ण याठिकाणी कधीच आला नव्हता पण चित्ररूपाने इकडच्या लोकांना महाभारत समजावण्यासाठी पल्लवाने हे सारे कोरीव काम सुमारे १४०० वर्षांपूर्वी केले आहे. पण पल्लव कोण होते आणि त्यांनी कृष्णकुंज करण्यासाठी याच ठिकाणाची निवड कां केली हे मात्र समजू शकले नाही. ( आमचा गाईड पल्लवाज् म्हणून उल्लेख करत होता, म्हणजे मला तरी असं वाटतंय् की पल्ल्वांच्या अनेक पिढ्यांनी येथे काम केले असावे.) तिथून थोडं पुढे गेल्यावर एक प्रचंड मोठी शिळा आहे , नैसर्गिकरित्या स्वतःला तोलून धरणारी ती शिळा अशा एका टोकावर उभी आहे की जरासा धक्का लागला तर ती कधीही खाली कलंडू शकेल असे वाटते. पण आमच्या गाईडच्या सांगण्यानुसार सात हत्तींनी धक्का मारूनसुध्दा ती शिळा जागची हलली नाही. Balancing चा हा एक नैसर्गिक चमत्कार आहे. या शिळेला म्हणतात ’Krishnas Butter Ball’ !!!!
तिथेच थोडं पुढे गेलं की दोन शिळा एकमेकांना टेकून तयार झालेली नैसर्गिक गुंफा दिसते. ही होती फॅक्टरी जिथे पल्लवाने कोरीव काम करण्यासाठी हत्यारे तयार केली. मोठमोठाल्या शिळा फोडण्यासाठी डायनॅमो वगैरे न वापरता एक वेगळेच तत्त्व येथे वापरले होते. जो दगड फोडायचा आहे, त्यावर छोटे छोटे छेद करून घ्यायचे, त्यामध्ये एका विशिष्ट प्रकारच्या लाकडाचे तुकडे टाकून त्यामध्ये गरम पाणी ओतायचे, त्या गरम पाण्याने लाकूड प्रसरण पावते आणि १५-२० दिवसांत तो दगड फुटतो. हे ऎकतानाच अंगावर काटा आला. आपले पूर्वज काय अफाट बुध्दीमत्तेचे होते नं!! हातात फारशी काही साधने नसताना १४०० वर्षापूर्वी केवळ आम जनतेला माहिती व्हावे म्हणून एवढे कष्ट करून पल्लवांनी या शिल्पकृती तयार केल्या आहेत. मनातून खूप भरून आलं होतं. याच ठिकाणी गंगा नदी आणि शिवशंकराचाही देखावा तयार केला आहे. इंदिरा गांधी महाबलीपुरम्ला बर्याचदा यायच्या म्हणे!! येथे बकरी आणि हरीण बसलेले एक शिल्प आहे, जे आपल्या पूर्वीच्या १० रु.च्या नोटेवर छापले
होते, याठिकाणाची स्मृती म्हणून !!.
याच भागात वेगवेगळया छोट्या गुंफा आहेत, त्यामध्ये विष्णूचे जे दहा अवतार आहेत, त्यापैकी वराह अवतार आणि वामनावतार यामधील काही शिल्पे कोरलेली आहेत. कृष्णकुंज बघून बाहेर पडताना आपण एका भारलेल्या अवस्थेतच असतो.
फारच सुंदर जागा आहे , भारतात आपल्यावर येथे भ्रमंती करावयास आवडेल.
सर्वात प्रथम नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
प्रतिक्रियेबद्द्ल धन्यवाद….. आपल्याला जर पुरातन लेणी, शिल्पकला यांची आवड असेल तर महाबलीपूरम् बघणं हे मस्ट आहे. 🙂
छान वर्णन आहे. पल्लव हे तमिळ राजे होत. चोळ, चेर आणि पांड्य या तीन घराण्यांप्रमाणेच पल्लव राजांनीही आंध्र-तमिळमधील संस्कृतीला आकार दिला.
सर्वात प्रथम नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
आपल्या माहितीपूर्ण प्रतिक्रियेबद्द्ल धन्यवाद…..
आमच्या गाईडला आम्ही पल्लवाज् कोण असे विचारले होते, पण त्याच्याकडून उत्तर आले नाही. बहुदा त्यालाही माहित नसावे किंवा त्याला आम्ही काय विचारले हे कळाले नसावे. तो जरी इंग्लीशमध्ये माहिती देत असला तरी ते इंग्लीश मिक्स तमिळ होतं आणि मला तरी असं वाटत होतं की त्याने ती सगळी माहिती पाठ केली असावी. कारण साध्या इंग्लीशमधून विचारलेल्या साध्या प्रश्नांची उत्तरे त्याला देता आली नाहीत. तसाही इकडे साउथमध्ये भाषेचा बर्यापैकी अडसर येतो. 😦