स्टीफन कोवेचे ९०-१० तत्त्व

स्टीफन कोवे , एक अमेरिकन विचारवंत.. 7 habits of highly effective people या आणि यासारख्या बर्‍याच पुस्तकांचे लेखक आहेत . अलिकडेच एका ई-मेलमधून स्टीफन कोवेचे हे तत्त्व वाचनात आलं. एक चांगला विचार माझ्या वाचकांपर्यंत पोचवण्यासाठी ही पोस्ट….

ज्या गोष्टीत आपण प्रतिक्रिया / प्रतिसाद देतो त्यामध्ये ९०-१० तत्त्वाचा अंगीकार केला तर आपलं आयुष्य बदलण्याची क्षमता या ९०-१० तत्त्वात आहे असा स्टीफन कोवेचा दावा आहे. काय आहे हे ९०-१० तत्त्व ?आपल्या बाबतीत जे काही घडतं आणि ज्यावर आपला ताबा नसतो अशा गोष्टी फक्त १० टक्के असतात. उदा. आपल्या कारचे ब्रेक फेल होणं, एखाद्या महत्वाच्या मिटींगला जात असताना बस / ट्रेन / फ्लाईट यासारख्या गोष्टी ठरलेल्या वेळेपेक्षा उशिरा येणं , एखाद्या पार्टीला जायचं ठरलेलं असताना जवळच्या व्यक्तीला दुखापत होणं वगैरे. तर अशा गोष्टी ज्या घडण्यापासून आपण थांबवू शकत नाही आणि त्या गोष्टींचा आपल्यावर होणारा परिणाम आपण टाळू शकत नाही , अशा गोष्टी फक्त १० टक्के असतात. मग राहिलेल्या ९० टक्के गोष्टी ? या तुम्ही ठरवत असता….. कशा ? तर त्या १० टक्क्यावर तुम्ही जी प्रतिक्रिया / प्रतिसाद देता त्यावर उरलेल्या ९० टक्के होत असतात…. पटतंय्‌? ठीक आहे , आपण यासाठी एक उदाहरण पाहू.

घरात सकाळची गडबड चालू आहे, तुम्हाला ऑफिसला जायचे आहे, मुलीची शाळेची तयारी चालू आहे, बायकोलाही स्वयंपाक, आवराआवर करून ऑफिसला जायचे आहे . सर्व काही आवरून , ऑफिसला जाण्यासाठी तयार होऊन तुम्ही नाष्टा करत आहात आणि मुलीच्या हाताचा धक्का चुकून चहाच्या कपाला लागतो आणि तो चहा तुमच्या शर्टवर, पॅंटवर सांडतो. ही १० टक्क्यांमधली गोष्ट झाली जी तुमच्या ताब्यात नाही पण यावर तुम्ही कसा प्रतिसाद देता यावर पुढच्या ९० टक्के गोष्टी होत असतात…. नाही पटत….? बघा हं

प्रतिसाद १ – तुमच्या शर्ट-पॅंट्वर चहा सांडल्यावर तुमची चिडचिड होते आणि तुम्ही मुलीवर रागावून ओरडता. आधीच बावरलेली तुमची मुलगी रडायला सुरवात करते. आता तुम्हाला तिची समजूत घालणं भाग आहे आणि बालस्वभावानुसार तुम्ही समजूत घालायला लागल्यावर मुलगी जास्त जोरात रडायला लागणार… 🙂 तिची शाळेची तयारी पूर्ण होईपर्यंत स्कूलबस निघून जाणार. तुम्हाला तिला शाळेत सोडून मग ऑफिसला जावं लागतं , नेहमीपेक्षा उशिरा ऑफिसला पोचल्याने तुमची चिडचिड अजून वाढणार, मग दिवस असाच वैतागात, इतरांवर रागावण्यात जाणार ….

म्हणजे बघा हं, जो दिवस नेहमीसारखाच चालू झाला होता, तो केवळ एका घटनेमुळं वैतागवाण्या दिवसात बदलणार… ती एक घटना कोणती? तुमच्या शर्ट्वर चहा सांडला ही ….? नाही…. तर त्या चहा सांडण्यावर तुम्ही जो प्रतिसाद दिला ती….. जर तुम्ही तुमचा प्रतिसाद बदलला असता तर?

प्रतिसाद २ – तुमच्या शर्ट-पॅंट्वर चहा सांडल्यावर तुमची चिडचिड होते , पण ती व्यक्त न करता तुम्ही मुलीला म्हणता की ” बेटा, माझे कपडे खराब झाले नां.. पुढच्या वेळी काळजी घे हं. ok, no problem ” आणि पटकन्‌ कपडे बदलायला तुम्ही जाता… मुलगी वेळेत आवरून स्कूलबसमधून शाळेत जाते ( कारण मधला रडण्याचा कार्यक्रम होणार नाही … 🙂 ), तुम्ही हसत तिला टाटा करता, आणि ऑफिसला जाता, नेहमीप्रमाणे वेळेत तुमची कामे चालू होतात आणि आनंदात दिवस संपतो….काय पटतंय्‌ कां….?

ज्या आपल्या आवाक्याबाहेरच्या असतात त्या तुम्ही टाळू , बदलू किंवा थांबवू शकत नाही अशा फक्त १० टक्के गोष्टी असतात आणि त्यावर तुम्ही जी प्रतिक्रिया , प्रतिसाद देता त्यावर पुढे होणार्‍या ९० टक्के गोष्टी अवलंबून असतात. हो नां? थोडक्यात कोणत्याही गोष्टीचं Happy Ending कसं करायचं हे आपल्याच हातात असतं…. 🙂

(मूळ इंग्लिशमध्ये असणारी ही इ-मेल मी मराठीत भाषांतरीत केली आहे.)

2 comments on “स्टीफन कोवेचे ९०-१० तत्त्व

  1. मनोहर म्हणतो आहे:

    ९० टक्के बाबतीत सुखान्त शेवटाची गरजच नसते.

  2. Uday म्हणतो आहे:

    very well said through practical example, eager to read more practical tips. thanks

Leave a reply to Uday उत्तर रद्द करा.