बस (च)…..

“अगं हे काय प्रज्ञा, आज चालत? गाडी (पक्षी : स्कूटी) सर्व्हींसिंगला दिलीय कां?” किमान १५ जणांनी तरी हा प्रश्न गेल्या महिन्याभरात मला विचारला असेल…

त्याचं काय झालं की मागच्या महिन्यापासून ऑफिसला जाताना मी स्कूटी न नेता बसने जायला लागले. जेव्हा सुरवात केली तेव्हा सकाळी सकाळी माझ्या स्कूटीचे मागचे चाक पंक्चर झाले होते. ऑफिसला उशिर होत होता म्हणून मी मेनरोडपासून शेअर-रिक्षा पकडू असे ठरवले. आणि चक्क मेनरोडला पोचल्यापोचल्या २ मिनिटात सिटी बस आली…. अजून एक सांगायचे म्हणजे नाशिकला साधारण वर्षभरापूर्वी नविन सिटी बस आणल्यात. छान चकाचक, उभे राहण्यासाठी किंवा बसण्यासाठी ऎसपैस जागा आणि महत्वाचे म्हणजे बसमध्ये संयत आवाजात वाजणारा FM रेडीओ….अशा छान छान बस काही ठराविक रूटवर चालू केल्या आहेत…ऑफिसमधल्या बहुतेकजणींनी अशा बसने प्रवास करून काय मस्त बस आहे, बसमध्ये किती छान वाटतं, मस्त गाणी ऎकत आपला स्टॉप कधी येतो ते कळतच नाही… असं सांगून सांगून मला जळवलं होतं… आणि तशातलीच एक छान बस माझ्यासमोर आल्यावर मी संधी दवडली नाही आणि बसने ऑफिसला जायचे ठरवले…मग तिकिट काढताना कळले की बसचा प्रवास किती economical आहे ते…..उतरताना कळाले की अरे, आपल्या ऑफिसच्या दारात तर बसचा स्टॉप आहे … त्यादिवसापासून ठरवूनच टाकले की आता रोज बसनेच ऑफिसला जायचे….

इतकी वर्षे बाहेर कुठेही जायचं असलं तरी स्कूटीशिवाय माझं प्रस्थान व्हायचं नाही… साधं कोपर्‍यापर्यंत जायचं असलं तरी स्कूटी… ही सवय मला मोडायचीच होती. मग मी घेतलेला, किमान ऑफिसला तरी बसनं जायचं हा निर्णय योग्य कसा आहे ते मलाच पटवणारी काही कारणं मी शोधलीयत्….

१. पेट्रोलचे भाव किती वाढलेत… आता एकट्याला जाण्यासाठी स्कूटी परवडत नाही.

२. बसचा स्टॉप ऑफिसच्या अगदी दारातच आहे.

३. घरून जाताना बसच्या स्टॉपपर्यंत जरी चालावे लागले तरी फक्त ५ ते ७ मिनिटेच चालावे लागते. चालणं आरोग्यासाठी, फिटनेससाठी चांगलंच…

४. ‘परिघ’ हळूहळू आकुंचन पावतोय हे लक्षात येतंय्…. ५ ते ७ मिनिटे चालल्यावर एवढा परिणाम मग ऑफिसला चालतच जाऊ कां?

५. स्कूटीने जायला १० मिनिटे लागतात तर बसने १५ …. ठीक आहे … फार काही फरक नाही…. इतर मोठ्या शहरातल्या लोकांना तर ३० ते ४५ मिनिटांचा ट्रॅव्हल करून ऑफिसला जावे लागते… त्यामानाने मी किती सुखी आहे…

६. परत येताना बहुतेकदा बस उशिरा येते. पण स्टॉपवर नुसतं थांबलं तरी इतरांच्या गप्पा ऎकण्यात छान वेळ जातो… आणि माझ्या ऑफिसच्या जवळच्या स्टॉपवर खूप कॉलेजचे , शाळेचे विद्यार्थी असतात, त्यांच्या गप्पा ऎकणं हा मस्त टाईमपास आहे.

७. जरी कुणाच्या गप्पा नाही ऎकू  आल्या तरी येणार्‍याजाणार्‍यांचं निरिक्षण करण्यात , त्यावरून काही तर्क बांधण्यात छान वेळ जातो… (सध्या मी ‘संपूर्ण शेरलॉक होम्स’ वाचतेय्… त्यामुळे असं निरिक्षण करण्याची , त्यावरून तर्क करण्याची खोड लागलीय…)

८. येताजाताना वाटेतली काही कामं करायची असतील तर स्कूटी बरी पडते. असा विचार मनात आल्याक्षणीच कायकाय कामं करायची असतात याची लिस्टच काढली. पेट्रोल भरणे, भाजी / फळं / वाणसामान आणणे, श्रृतीच्या शाळेत टीचरला भेटायला जाणे, वगैरे…नंतर लक्षात आलं की यातली बरीचशी कामं ऑकेजनली करावी लागतात…काही कामं घरी येऊन नंतर केली तरी चालतात. त्यामुळे या कारणासाठी बसने जाणं रद्द करायची गरज नाही. फारतर अशा एखाद्या वेळेस स्कूटीनं जाऊ…

९. आता पावसाळ्यात तर स्कूटीपेक्षा बसने जाणं केव्हाही चांगलं…. एकतर नव्या बसेस गळक्या नाहीयेत्‌… स्कूटीवरून पावसात जायचं म्हणजे गाडी स्लो चालवावी लागते नाहीतर गाडी स्लीप होण्याचे चान्सेस जास्त… तो रेनकोट घाला , काढा हा वैताग …घरून निघताना पाऊस नाही म्हणून रेनकोट घातला नाही आणि थोड्ं पुढे गेल्यावर पाऊस लागला तर वाटेत कुठेतरी गाडी थांबवून रेनकोट घालावाच लागतो…हा प्रकार मलातरी वैतागवाणा वाटतो… (आता जरा जास्तच असं वाटू लागलंय्…)

१०. जरा चार लोकांमध्ये मिसळता येतं.. बसमधून ये-जा करताना तर काही काही नमुने भेटतात… मग परत माझ्यातला शेरलॉक होम्स जागा होतो….

११. बसची वाट पहाण्यामुळे पेशन्स वाढतो… पेशन्स इज अ ग्रॆट स्ट्रेंग्थ यु नो… माझी चिडचिड हल्ली कमी झालीय् वाटतं….  

१२. आणि सर्वात महत्वाचे कारण – होता होईल तितका पर्यावरण रक्षणाला हातभार लावता येतो. माझ्या स्कूटीचं PUC आहे हो!! पण स्कूटी न नेता बसने गेले तर तेवढीच पेट्रोल बचत पर्यायाने उर्जा बचत आणि ०.००००००१% ने का असेना , प्रदुषण कमी….आणि तेवढाच पर्यावरण रक्षणाला हातभार…. आपण काही ‘Go Green’, ‘Green India’ , ‘Save Trees’ असा जागतिक संदेश देणारे टि-शर्टस्‌ घालून पर्यावरणाचे रक्षण करा असे सांगायला डोल्लेशोल्ले असणार्‍या अभिनेत्यासोबत रॅम्पवर नाही चालणारोत… तेव्हा कृतीतून पर्यावरणचे रक्षण केलेले चांगलें … कसें? (पुणेरी स्टाईलमध्ये अनिनासिक स्वरात ‘कसें’ हा शब्द वाचला तर या मुद्याचे महत्त्व जास्त कळेल…)

 बघा एवढे सारे फायदे मला जाणवले… ते ही एका महिन्यांत…. मग योग्यच आहे बसनं जाणं येणं…

चला बाय् बाय्… बसची वेळ झालीय्…

Advertisements

4 comments on “बस (च)…..

  1. thanthanpalthanthanpal म्हणतो आहे:

    अतिशय योग्य निर्णय. जर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आपण व्यवस्थित सुधारली तर इंधनाची मोठ्या प्रमाणात बचत होऊन आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचे निम्मे प्रश्न सुटतील . पण सरकारने वैयक्तिक वाहन व्यवस्थे वर नको इतका भर दिला त्याच बरोबर सार्वजनिक वाहन व्यवस्थे कडे चक्क दुर्लक्ष केले . अनेक लहान वाहने रस्त्यावर येत असल्या मुळे वाहतुकीची कोंडी होती .या मुळे आपल्या वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा कधी वाजतील हे सांगता येत नाही चीन जपान या देशांनी मात्र सार्वजनिक व्यवस्था बळकट केली. पण आपल्या तज्ञांना जनतेस काय हवे हेच माहीत नाही हे दुर्देव्य

    • प्रज्ञा म्हणतो आहे:

      हो नां… आमच्याकडे तर गेल्या काही महिन्यांत बससेवा नियमितपणे चालू आहे. त्याआगोदर बसच्या येण्याजाण्याच्या वेळा नियमित नसायच्या. सार्वजानिक वाहतूक व्यवस्था सुधारली आणि त्याची माहिती व्यवस्थित दिली तर वैयक्तिक वाहने वापरण्याचे प्रमाण बरेच कमी होईल….

  2. सुहास म्हणतो आहे:

    मस्त.. सगळ्यांनी असाच विचार करावा..!!

  3. writetopaint म्हणतो आहे:

    मला तर दुसरा पर्याय ही नाही. स्टेशन लांब, शिवाय गर्दीत (गर्दी? नव्हे, गर्दीचा महापूर!) ट्रेन मध्ये चढण मला जमत नाही. बसचा प्रवास बेस्ट!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s