शिस्त…..

 

ट्रॅफिकचे नियमांचं पालन करायचं असतं कां?

काल मी एका ट्रॅफिक सिग्नलवर तो सिग्नल हिरवा व्हायची वाट पहात होते त्या ३०-३५ सेकंदात जे घडलं ते पाहून वरचा प्रश्न माझ्या मनात आला. तर काल घरी जाण्यासाठी निघाले तेव्हा नाशिकच्या अगदी मेन रोडवर सिग्नलसाठी थांबावे लागले. आता या सिग्नलवर (चक्क !) चालू असलेल्या ‘टायमर’ मुळे कळाले की सिग्नल सुटायला अजून ५१ सेकंद बाकी आहेत. मग स्कूटीचे इंजिन बंद करून सिग्नल सुटायची वाट पहात थांबले. हळूहळू वाहनांची गर्दी वाढायला लागली. सिग्नल सुटायला ३१ सेकंद बाकी असताना तीन बाईकस्वार आले. म्हणजे एकाच बाईकवर तिघेजण होते आणि जोरजोरात , कर्णकर्कश्य हॉर्न वाजवत , बाकीच्या वाहनांना सरकून जागा द्यायला लावत ते पुढे आले.  सिग्नल सुटायला अजून २७ सेकंद बाकी होते. मग “च्याxxx, एवढा वेळ वेट कोण करणार?” असं म्हणत तो सिग्नल तोडून पुढे निघाले, जात असताना मागच्यांना मूर्खात काढायला विसरले नाहीत. आता परिस्थिती अशी होती की आमच्या उजव्या बाजूचा सिग्नल संपून ३ सेकंद झाले होते तरीही तिकडची वाहने जाण्याचे थांबले नव्हते, आमच्या समोरचा सिग्नल चालू होता आणि तिकडूनही वाहने जाणे चालू होते, तशात हे ‘सिग्नल तोडे’ मधे घुसलेले…..त्या तिघांनी जोरजोरात , कर्णकर्कश्य हॉर्न वाजवत वाजवत पुढे जाणे चालू ठेवले, बाकिच्यांनी त्यांचा उद्धार चालू केला तरी त्यांना काही फरक पडत नव्हता , कारण त्यांना असं किती अंतर पार करायचं होतं ? (आणि महत्वाचं म्हणजे भारत-पाकिस्तान मॅच थोड्याच वेळात चालू होणार होती नां?) इतर कुणाच्या लक्षात येईपर्यंत ते दुसर्‍या टोकाला पोचले सुध्दा आणि निघूनही गेले. मग आमच्यासारखे जे अजूनही सिग्नल सुटायची वाट पहात होते, त्यांच्यात आपापसात बोलणं चालू झालं ,”पाहिलंत, काय ती पोरं”, “च्याxxx, आपण काय वेडे म्हणून सिग्नल सुटायची वाट पहात थांबलोय कां?” , “कानाला धरून एकेकाला ट्रॅफिकचे नियम शिकवायला पाहिजेत”, “बापाकडे पैसा असेल चिक्कार , मग सुचतात असले धंदे. “……

खरंच रहदारीचे नियम हे प्रत्येकाला माहिती असतात पण त्याचं पालन मात्र आपल्या सोईनुसार, स्वभावानुसार, सव‌यीनुसार केलं जातं. आमच्या ऑफिसच्या उजव्या बाजूचा रस्ता हा फक्त जाण्यासाठी वन-वे आहे आणि डाव्या बाजूचा रस्ता मागच्या रस्त्यावरून येण्यासाठे वन-वे आहे. पण प्रत्येकालाच घाई एवढी असते की तो वन-वे चा बोर्ड पहाण्याइतकाही कुणाला वेळ नसतो. थोडंसंच अंतर जायचं म्हणून चुकिच्या दिशेने वाहने चालवली जातात. जोराजोरात हॉर्न वाजवत १००-१२० च्या वेगात वाहन चालवणं, पुढे जाताना मागच्या वाहनाला ‘कट’ मारून पुढे जाणं हे तर खूप कॉमन झालंय्‌…आपल्याला पुढे उजव्या/डाव्या बाजूला वळायचं आहे, तर आपले वाहन थोडं आधीपासूनच त्या दिशेला चालवणं हे योग्य असतं. कळतंय्‌ पण वळत नाही. अर्थात या नियमांचं पालन हे आवर्जून केलं जातं पण कधी ? तर ‘मामा’ आपल्या नजरेच्या टप्प्यात असेल तर एरवी चलने दो. मग जे प्रामाणिकपणे नियम पाळतात, त्यांनाही कधीतरी वाटतंच की “अरे,आपणच काय घोडं मारलंय्‌ म्हणून आपण शिस्तीत वागायचं?” मग तेही ह्ळूहळू नियमांचं उल्लंघन करू लागतात. (सगळेच असं करत नाहीत. याची कृ. नों. घ्या.)

शेवटी शिस्त पाळणं हे आपल्याच फायद्याचं असतं. वरच्या प्रसंगात जर काही अपघात झाला असता तर गाडीचं झालेलं नुकसान भरून येऊ शकेल, पण त्या व्यक्तीला काही दुखापत झाली तर त्याच्या आयुष्यातले काही महत्वाचे तास, दिवस, वर्षे वाया जातात, त्याची मोजदाद कशातही करता येत नाही. आपल्याला स्वत:ला काही झालं तर ठिक आहे, आपल्याच चुकीनं हे घडलं म्हणून पश्चाताप तरी करता येईल पण जर आपल्या चुकीची सजा दुसर्‍या कुणाला भोगावी लागली तर आयुष्यभर ही गोष्ट पोखरत राहते. तेव्हा कृपया रहदारीचे नियम पाळा, जे पाळत आहेत त्यांनी तसंच चांगलं वागणं चालू ठेवा आणि इतरांनाही रहदारीच्या नियमांचं पालन करण्यासाठी प्रवृत्त करा……

(कोणाला सल्ला देण्याएवढी मी मोठी नाहीय्‌, पण कळकळीनं जे सांगावसं वाटलं ते इथं सांगितलेय्‌….)

 

One comment on “शिस्त…..

  1. tanaji म्हणतो आहे:

    tuja lekh agdi manapasun avadla tuja lekhanila maja manacha mujra……..:

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s