इच्छापूर्ती

 

लहानपणी जाग यायची ती रेडीओवर वाजणार्‍या लता मंगेशकर, आशा भोसले किंवा सुमन कल्याणपूरच्या सुमधूर आवाजातील भजनाने किंवा भक्तीसंगीताने. मग बातम्या, प्रभातीचे रंग ( त्याची टायटल लाईन अजून आठवतेय – “काही बातम्या, घडामोडी आणि संगीतावर आधारीत विशेष कार्यक्रम“), कृषीवाणी वगैरे ऎकत शाळेची तयारी व्हायची कशी व्हायची ते कळायचे नाही. त्यावेळी कोल्हापूरला सांगली आकाशवाणी केंद्र लागायचे. त्यावरची फिनोलेक्स पाईपची जाहीरात अजूनसुद्धा त्याच्या र्‍हीदमसकट आठवतेय. ” —– पाणी, आणायचं कुणी? सांगतो राणीफिनोलेक्सनं आणलं पाणी, शेतं पिकली सोन्यावाणी…. फिनोलेक्स पाईप“…. टंग्‌ssssss . हा टंग्‌ssssss तर आकाशवाणीचा खास असायचा. एका कार्यक्रम संपला हे यातून कळायचे. त्यावेळेपासून फार इच्छा होती की हे आकाशवाणी केंद्र आतून पहायचे. तिथे ध्वनीमुद्रण कसे चालते ते पहायचे. पण तो योग काही तेव्हा आला नाही.

आमच्या इन्स्टीट्यूटने नाशिक आकाशवाणीवर हार्डवेअर आणि नेटवर्कींगवर एक शैक्षणिक मालिका करायचे ठरवले. तेव्हा ही मनातली इच्छा परत उफाळून आली. मी आमच्या मॅमना म्हंटलं, “मी नेटवर्कींगचा एक एपिसोड करू कां?” चक्क दोन एपिसोडची परवानगी मिळाल्यावर आधी पूर्ण भाषण लिहून काढले. आम्हाला प्रत्येक एपिसोडसाठी साडेतीन मिनिटे मिळणार होती , त्यात कॉम्प्युटर हार्डवेअर आणि नेटवर्कींगची माहिती द्यायची होती. आकाशवाणीवर भाषण द्यायचे म्हणून व्यवस्थित मराठीत (बरहाताईंच्या मदतीने) सर्व माहिती लिहून काढली. सर्व टेक्निकल माहिती मराठीत लिहताना बरीच झटापट करावी लागली. मग हे भाषण वेळ लावून वाचून पाहिले तर ५ मि. ५० से. लागले. मग काटछाट केली, काही मुद्यांचे स्पष्टीकरण कमी केले आणि पुन्हा एकदा वाचले तर ३ मि. २५ से. लागले. आमच्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण झाली.

आकाशवाणीकडून ध्वनीमुद्रणासाठी शनिवार दुपार ४.३० ची वेळ मिळाली होती. शनिवारी आम्ही तिथे पोचलो. मनात आधीच दडपण होते. पूर्वी शाळेत असताना नाट्यवाचन, नाट्यछ्टा, शालेय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वगैरे मी केले होते. तेव्हा शिकलेल्या काही गोष्टी म्हणजे आवाजाची पातळी कशी ठेवायची, पॉज कुठे, कसा, किती घ्यायचा, आवाजात चढउतार कसा करायचा, बोलताना वाक्य अगदी शेवटच्या शब्दापर्यंत पूर्ण म्हणायचे याची मनातल्या मनात उजळणी चालू होती. तो आकाशवाणीचा साउंडप्रूफ स्टुडीओ, भिंतींवर लावलेले वेलवेट, कॉम्प्युटरला जोडलेले ध्वनिमुद्रणाचे मशिन (‘लगे रहो मुन्नाभाईतविद्या बालन RJ दाखवली आहे, त्यात ते मशिन दाखवलंय्‌), दोन मोठे माइक्स, खुर्ची सरकवल्याचाही आवाज होऊ नये म्हणून जमिनीवरही अंथरलेले वेलवेटचे कार्पेट, मोठे मोठे स्पीकर्स आणि हेडफोन्स !! ….. हळूहळू धडधड वाढायला लागली होती.

ध्वनिमुद्रण करणार्‍या सरांनी सांगितले,” हे बघा, अजिबात टेंशन घेऊ नका. एकदम रिलॅक्स आणि आवाजात फुल थ्रो देऊन बोला. ( हे म्हणजे फोटोग्राफरने मी आता फोटो काढतो, एकदम नॅचरली हसाअसे सांगण्यासारखे होते. असो) असं समजा की तुम्ही तुमच्या वर्गात विद्यार्थ्यांसमोर बोलताय्‌ आणि हे बघा बोलताना काही चुकलं तर थोडा जास्त पॉज घेऊन तेच वाक्य परत म्हणायचं. जिथे चा उच्चार करायचा असेल तिथे मान थोडी बाजूला करून बोला. डायरेक्ट माईकवर बोललेला ऎकायला गोड वाटत नाही“. एका दमात सगळ्या सुचना देऊन झाल्या. पहिल्यांदा माझी साउंड टेस्टघेतली. त्यात आवाज एकदम ओके आहे असे कळल्यावर जीव भांड्यात पडला. मग चालू झाले रेकॉर्डींग. मी ठरवल्याप्रमाणे वाचायला सुरवात केली. “थांबा, असं वाचल्यासारखं बोलू नका हो. तुम्ही आकाशवाणीवरून श्रोत्यांशी संवाद साधताय्‌. तेव्हा एकदम बोली भाषा ठेवा. श्रोतेहो अशी काही काही वाक्यांची सुरवात करायची म्हणजे ऎकणारी लोकं रीलेट करतात कार्यक्रमाशी. चला परत सुरवात करू” . मग नंतर आवाजाचा टोन, एकूण भाषण वगैरे छान झाले. पण एका दमात भाषण झाल्यामुळे सुरवात दमदार आणि आवाजाची पातळी नंतर कमी कमी झाली होती. असे ४ ५ रीटेक झाल्यावर भाषण ओके झालं. आता मी व्यवस्थित भाषण करू शकते असा विश्वास आला आणि दुसरं भाषण चक्क २ टेकमध्ये ओके झालं. नंतर ध्वनीमुद्रण केलेली दोन्ही भाषणं त्यांनी ऎकवली.

माझा विश्वासच बसत नव्हता की लहानपणीची इच्छा पूर्ण झाली आणि माझ्या आवाजाचं आकाशवाणीवर ध्वनीमुद्रण झालं आहे. !! तिथे असणार्‍या असिस्टंट मॅमनी मला सांगितले तुमचा आवाज खूप गोड आहे आणि रेडीओला सुटेबल आहे. तुम्ही आकाशवाणीवर ऑडीशन टेस्ट कां देत नाही? मी आत्ताच सांगते की तुम्ही पास झाल्या आहात. तुम्ही तुमची नोकरी सांभाळूनही आकाशवाणीवर अनाऊन्सर म्हणून काम करू शकता…..” अरे काय ऎकतेय्‌ मी!!! ‘आंधळा मागतो एक नी देव देतो दोन डोळेअशी माझी गत झाली होती. तसं मला खूप जणांनी सांगितलं आहे की तुमचा आवाज गोड आहे, उच्चार खूप स्पष्ट आणि शुद्ध आहेत म्हणून , पण लहानपणापासून जे एक आवाजाचं स्टॅंर्ड्ड मनात होतं तिथून सर्टीफिकेट, कौतुक मिळणं हे खूप छान वाटलं.

ता.तिथून परत आल्यावर माझी मनस्थिती अगदीआज जमींपर नही है मेरे कदम’ अशी होतीइति माझा नवरा. !!!Advertisements

4 comments on “इच्छापूर्ती

 1. देवेंद्र चुरी म्हणतो आहे:

  इच्छापूर्ती बद्दल अभिनंदन …. 🙂
  पुढे काही केल कि नाही मग आकाशवाणीवर …

  • प्रज्ञा म्हणतो आहे:

   धन्यु देवेंद्र !! आकाशवाणीवर रेकॉर्डींगचा अनुभव खूप छान होता . सध्या त्याच प्रोगॅमचं री-ब्रॉडकास्टींग चालू आहे नाशिक आकाशवाणीवर १०१.४ Mhz. रोज संध्याकाळी ६.५० वाजता…

 2. सुहास म्हणतो आहे:

  अरे वा… अभिनंदन (उशिराने)

  त्या कार्यक्रमाची रेकॉर्डिंग असेल, तर अपलोड करा ना यु ट्यूब किंवा ई स्निप्सवर. ऐकायला आवडेल. 🙂

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s